
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारला टिकेचे लक्ष्य केले आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा राज्याचा विकास करणारा नसून केवळ कंत्राटदारांचे खिसे भरणारा असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात प्रत्येक मिनिटाला केवळ कंत्राटदारांसाठीची धोरणे आणि घोषणांचा भडीमार करण्यात आला. कंत्राटदारांवर एवढा मोठा खर्च प्रस्तावित असूनही कामाचा दर्जा मात्र अत्यंत निकृष्ट आहे. नुकत्याच झालेल्या रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा आणि एमएमआरडीएने (MMRDA) बांधलेल्या मिरा-भाईंदर उड्डाणपुलाची अवस्था याचे ज्वलंत उदाहरण आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
The Budget of the State of Maharashtra today seemed more like a budget for contractors than for Maharashtra.
• Essentially every minute of the long speech was spent on policies and announcements for contractors.
• The bigger issue is, even with this kind of expenditure and…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 6, 2026
आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाला ‘ॲलिस इन वंडरलँड’ (Alice in Wonderland) अशी उपमा दिली आहे. जमिनीवरची परिस्थिती काय आहे आणि आजूबाजूचे लोक त्यांना काय दाखवत आहेत, याचे भान मुख्यमंत्र्यांना उरलेले नाही. संपूर्ण भाषणात केवळ जुन्या धोरणांची उजळणी करण्यात आली आणि प्रत्येक घोषणेसाठी २०४७ सालापर्यंत वाट पाहण्यास सांगितले गेले आहे. जर हेच सरकार राहिले तर, कशाहीसाठी २०४७ पर्यंत थांबावे लागेल, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही केवळ धूळफेक आहे. “२०२० मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दिलेली कर्जमाफी ही वेळमर्यादेत आणि अत्यंत साधी होती. मात्र, सध्याच्या कर्जमाफीत शेतकऱ्यांची पात्रता काय, प्रक्रिया काय आणि ती कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही,” असे म्हणत आदित्य ठाकरे कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भाजप सरकार सर्वत्र झाडांची कत्तल करताना दिसत आहे. ३०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प सोडणे हा एक मोठा विनोद आहे. झाडांची कत्तल करणाऱ्या सरकारने अशा घोषणा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.



























































