रोखठोक – झुरळ मरत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणला झुरळासारखे मारू असे प्रे. ट्रम्प व पंतप्रधान नेतान्याहूंना वाटले, पण झुरळ भारी निघाले. युद्धाचा भडका उडालाच आहे. या निमित्ताने एक झाले. भारतीय नेतृत्व किती कमजोर व लाचार आहे हे जगाने अनुभवले!

राजकारण करण्याचे जे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी युद्ध हा एक मार्ग आहे. युद्ध या उपायाचा अवलंब केव्हा ना केव्हा तरी करावाच लागतो. त्याशिवाय राजकीय हेतू साध्य होत नाहीत हा जगाचा अनुभव आहे. इराणविरुद्ध अमेरिका, इस्रायल युद्ध हा एक ज्वलंत प्रश्न आहे. प्रे. ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी लादलेल्या युद्धामुळे आपल्या सगळ्यांचे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक जीवनसुद्धा बदलून जाणार आहे. या युद्धाने भारतीय नेतृत्वाचे फोलपण जगासमोर आले. पंतप्रधान मोदी यांनी मानवतेला काळिमा फासणाऱ्या युद्धस्थितीवर एक अवाक्षर तोंडातून काढले नाही. त्यामुळे त्यांच्या शौर्याची दंतकथा पुन्हा फोल ठरली आहे. इराणच्या जनतेला धर्मांध, हुकूमशाही राजवटीपासून मुक्त करण्यासाठी हे युद्ध आहे असे प्रे. ट्रम्प यांनी जाहीर केले व इराणवर बॉम्बहल्ले सुरू केले. मला आठवण झाली ती चीनची. तिबेटसंदर्भातील भूमिकेची.

1 जानेवारी 1950 रोजी माओ-त्से-तुंग यांनी जाहीर केले की, “साम्राज्यवाद्यांच्या आक्रमणापासून तीस लाख तिबेटी नागरिकांची मुक्तता करणे हे चीनच्या मुक्ती सेनेचे ध्येय आहे.” प्रत्यक्षात माओने तिबेटचा ताबा घेऊन तेथे चिनी साम्राज्याचा लाल बावटा फडकवला. आज अमेरिका व इस्रायलसारखी राष्ट्रे इराणच्या जनतेला स्वातंत्र्य वगैरे मिळवून देण्याची भाषा करत आहेत, पण सुप्रीम लीडर खामेनींची हत्या प्रे. ट्रम्प व नेतान्याहू यांनी मिळून केल्यावर इराणची जनता एकवटली व ती अमेरिकेच्या आक्रमणाविरुद्ध रस्त्यावर उतरली. अमेरिका, इस्रायल यांच्यासह आठ राष्ट्रे इराणविरुद्ध एकवटली. त्यात मुसलमान राष्ट्रांचा समावेश आहे व इराण या सगळ्यांशी एकाकी झुंज देत आहे.

इराणची दहशत

प्रे. ट्रम्प व पंतप्रधान नेतान्याहू यांना वाटले की, झुरळ मारावे तसे आपण इराण पादाक्रांत करू. इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांना ठार केले की, युद्ध संपून जाईल. तसे झाले नाही. इराणमध्ये अनेक नेते, जनरल मारले गेले तरी इराण झुंज देत आहे व इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्र डागत आहे. आखाती राष्ट्रांतील अनेक ठिकाणी अमेरिकेचे सैन्यतळ आहेत. तेथे इराणचा बॉम्बहल्ला झाला व दुबईसह अनेक राष्ट्रांत त्यांनी दहशत निर्माण केली. आखाती राष्ट्रांना युद्धाची सवय आहे आणि इस्रायल, अमेरिकेला युद्धाची खुमखुमी आहे. इराकने इराणबरोबर आठ वर्षे युद्ध केले, पण सद्दामला शेवटी इराणबरोबर समझोता जाहीर करावा लागला. अमेरिका तेव्हा सद्दामला बळ देत होती व त्याच सद्दामला पुढे अमेरिकेने फासावर लटकवून मारले. पाश्चात्त्य देश आणि तेल निर्माण करणारे आखाती देश यांच्यातील संघर्ष 75 वर्षे सुरूच आहे. 1951 मध्ये इराणच्या मुसादिकने अबादान येथील ब्रिटिशांच्या मालकीची तेल केंद्रे ताब्यात घेतली. या ब्रिटिश मालकीच्या तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. तेव्हा मुसादिकविरुद्ध लष्करी कारवाई नको असे दडपण अमेरिकेने ब्रिटनवर आणले. पुढे अमेरिकेने मुसादिकला उडविण्यास मदत केली, परंतु त्या बदल्यात ब्रिटिशांची अर्धी तेल केंद्रे ताब्यात घेतली. युद्धात उतरलेला प्रत्येक देश शेवटी आपापले हित पाहत आहे. इस्रायल हा जगातला सावकार देश आहे व अमेरिका पूर्णपणे व्यापारी देश आहे. नेतान्याहूवर प्रेम उतू चालले आहे म्हणून प्रे. ट्रम्प युद्धात उतरलेले नाहीत. इस्रायलने त्याची किंमत मोजली. युद्धात उतरण्याची किंमत म्हणून इस्रायलकडून प्रे. ट्रम्प यांना 300 मिलियन डॉलर्स मिळाले. त्यामुळे ट्रम्प हे इराणवर हल्ला करून ‘सुपारी’ घेतल्याची भूमिका वठवत आहेत. मानवता गेली चुलीत.

मनसुबे फसले

इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक शांतता आणि स्थैर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. इराणवर ताबा मिळवून तेथे आपल्या तालावर नाचणारा एखादा माणूस बसवायचा हे अमेरिकेचे मनसुबे साफ उधळले गेले आहेत. इस्रायलने गाझा पट्ट्यात जे क्रौर्य दाखवले ते जगाने पाहिले. 50 हजारांपेक्षा जास्त लहान मुलांना इस्रायलने मारले व आता तेहरानमधील मुलींच्या शाळेवर बॉम्ब टाकून दोनशेच्या वर कोवळ्या मुलींची हत्या केली. तरीही दुःख विसरून इराणची जनता युद्धखोरांविरुद्ध एकवटली. मुलांना ठार करणाऱ्या सैतानांना शरण जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध लढू अशी इराणी जनतेची भावना आहे. अमेरिकेने इराणमधील राजकीय स्थितीचा कितीही कांगावा केला तरी जनभावना इराणच्या बाजूने आहे. कारण अमेरिका अजगराप्रमाणे जबडा वासून बसली आहे आणि एकेक राष्ट्र व राष्ट्रप्रमुख गिळत आहे. (भारताचे नेतृत्वही त्यांनी गिळले.) व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरा यांना अमेरिकेच्या कमांडोंनी उचलून न्यूयार्कला आणले व तुरंगात डांबले. व्हेनेझुएलाच्या सर्व तेल विहिरींवर अमेरिकेने ताबा मिळवला व आमचेच तेल विकत घ्या असा दबाव ते भारतासह अनेक राष्ट्रांवर आणत आहेत. अशा कोणत्याही दबावाला इराण बळी पडला नाही. तेव्हा इराणवर बॉम्बहल्ले झाले. यात लोकांचे स्वातंत्र्य, मानवता, माणुसकी हे विषय आले कोठून? लहान मुलांची उघड कत्तल या युद्धात सुरू आहे व जग तोंड शिवून बसले आहे. विरोध करणाऱ्यांना अजिबात जिवंत ठेवायचे नाही असे जगातील दोन-चार राष्ट्रप्रमुखांनी ठरवले आहे आणि भारतासारखी राष्ट्रे त्या कटात सामील झाली आहेत. मोदी यांच्या मतदारसंघात, वाराणसी येथे त्यांच्या अनेक भक्तांनी ट्रम्प यांच्या विजयासाठी होमहवन सुरू केले यास काय म्हणावे! साम्राज्यवाद्यांची डोकी फिरली की, ते क्रूर होतात व एखादा वंश नष्ट करण्यासाठी युद्ध लादतात. गाझापासून तेहरानपर्यंत जग तेच दृश्य पाहत आहे. ज्यू धर्मीयांसाठी निर्माण झालेले राष्ट्र म्हणून इस्रायलकडे पाहिले जाते. गेल्या 65 वर्षांत इस्रायलला शेजारच्या मुस्लिम राष्ट्रांशी अनेकदा भीषण युद्धे खेळावी लागली, पण हे राष्ट्र जन्माला आले तेव्हा एकमेकांच्या धर्मात हस्तक्षेप न करण्याचे, अस्तित्वात असलेल्या धार्मिक कायद्यात बदल न करण्याचे आश्वासन करारात देण्यात आले होते, पण इस्रायलने बाजूचे पालेस्टाईन गिळण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला व गाझा भागात भीषण नरसंहार केला. इस्रायलची सावकारी मोठी असल्याने इतर राष्ट्रे गप्प बसली, पण इराणने गाझातील नरसंहाराविरुद्ध आवाज उठवला. त्यातून युद्धाचा भडका उडाला. युद्धात इस्रायलचे मोठे नुकसान झाले. ज्यू लोकांनी कष्टाने त्यांचा देश उभा केला, पण युद्धखोर नेतृत्वामुळे ‘ज्यू’ समाज व त्यांचा देशही संकटात सापडला. हे चित्र चिंताजनक आहे.

मोदी मौनात

मध्यपूर्व आशियात युद्धाचा भडका उडाला असताना भारत देश सर्व घडामोडीत आपले अस्तित्व गमावून बसला आहे. मोदी हे ‘विश्वगुरू’ आहेत अशी दंतकथा त्यांचे समर्थक नेहमी पसरवतात. मध्यपूर्वेतील घडामोडीत ही दंतकथा साफ कोसळून पडली. ज्याला नेता व्हायचे आहे त्याने आपल्यासंबंधी अनेक दंतकथा प्रसूत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत असे रोमेल याने म्हटले आहे. दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान मोदी हे अचानक इस्रायल दौऱ्यावर गेले. तेथे त्यांनी काय केले? इस्रायलच्या संसदेत ते भाषणाला उभे राहिले तेव्हा सर्व विरोधकांनी त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. संसदेच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींच्या गळय़ात एक पदक लटकवले. मोदी परत मायदेशी येताच इस्रायलने इराणवर हल्ला चढवून सुप्रीम लीडर खामेनी यांची हत्या केली. तेव्हापासून मोदी जवळ जवळ मौनात गेले. इराण-इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. ते थांबेल असे चित्र सध्या नाही. माओचे एक सूत्र प्रसिद्ध आहे, ‘यशाची खात्री असेल तरच चढाई करा आणि यश हातात येताच ती थांबवा. कोणतेही युद्ध जिंकायचे असेल तर याच क्रमाने गेले पाहिजे. हल्ल्याचा क्षण निवडताना जशी दक्षता घ्यायची तितक्याच हुशारीने युद्धविरामाचा क्षण निवडला पाहिजे.’

अमेरिका, इस्रायलसारखे देश जागतिक गुंडांसारखे वागत आहेत व भारतासारखे मोठे देश कालपर्यंत शौर्याच्या बढाया मारीत होते, ते या गुंडांचे ‘एजंट’ म्हणून काम करीत आहेत. युद्ध थांबावे यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा होता. तसे घडत नाही व इराणला झुरळासारखे मारू असे जागतिक गुंडांना वाटत होते, पण झुरळ भारी निघाले.

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]