मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर 52 हजारांहून अधिक हिंदुस्थानी मायदेशी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे हिंदुस्थानात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते ७ मार्च या कालावधीमध्ये ५२ हजारांहून अधिक हिंदुस्थानी नागरिकांना आखाती प्रदेशातून सुरक्षितपणे देशामध्ये परत आणण्यात आले आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर हिंदुस्थान सरकार सतत लक्ष ठेवून आहे. त्या प्रदेशातील सर्व हिंदुस्थानी नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच संबंधित भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या देशांमधील हिंदुस्थानी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी परिस्थितीबाबत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. तसेच तिथे असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना आवश्यक ती माहिती दिली जात आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः खुले करण्यात आले आहे. ज्या देशांमध्ये सध्या व्यावसायिक उड्डाणे उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांनी जवळच्या उपलब्ध उड्डाणांबाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधित दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.