शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करून कायदेशीर लढाई लढणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर धावत्या ट्रेनमध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. रीवा एक्सप्रेसने प्रयागराजकडे जात असताना फतेहपूर आणि कौशांबी जिल्ह्यातील सिराथू रेल्वे स्थानकादरम्यान हा हल्ला झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. हल्लेखोरांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला ट्रेनच्या शौचालयात कोंडून घेतले. रक्ताळलेल्या अवस्थेतच ते प्रयागराजला पोहोचले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशुतोष ब्रह्मचारी यांनी खळबळजनक दावा केला आहे. हल्लेखोरांना त्यांचे नाक कापायचे होते, असे त्यांनी सांगितले. या हल्ल्यामागे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रयागराज जीआरपी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वी आशुतोष ब्रह्मचारी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर मुलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. पूरग्रस्त भागातील मुलांना आश्रमात आणून त्यांच्याशी गैरवर्तन केले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून, आता झालेल्या या हल्ल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्यानंतर शंकराचार्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.