
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील ऐतिहासिक ‘वर्ल्ड वॉर 2’ या स्मारकासमोर डान्स करणे एका हिंदुस्थानी वंशाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली असून, आता अमेरिकन प्रशासनाकडून त्याच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मधू राजू असे या तरुणाचे नाव असून, तो बिगर-इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
व्हायरल झालेल्या या TikTok व्हिडिओमध्ये मधू राजू एका महिलेसोबत या स्मारकाच्या परिसरात डान्स करताना दिसत आहे. हे स्मारक दुसऱ्या महायुद्धात बलिदान देणाऱ्या 4 लाख अमेरिकन सैनिकांच्या आणि सेवा बजावलेल्या 1 कोटी 60 लाख जवानांच्या स्मृतीप्रत्यर्थ उभारण्यात आले आहे. अत्यंत शांतता आणि आदराचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या या स्मारकाचा वापर सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी केल्यामुळे अमेरिकन नागरिकांसह विशेषतः माजी सैनिकांच्या संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
This is the World War II Memorial in #WashingtonDC
Some places deserve respect
and some Indians need thrashing
Deport these shameless reel baaz ASAP pic.twitter.com/HuDXp8cD8l— Krishnan Gaur (@Mercedes5494) March 7, 2026
या घटनेनंतर सोशल मीडियावर हिंदूस्थानी समुदायातूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका वापरकर्त्याने संताप व्यक्त करताना लिहिले की, “हे स्मारक त्यागाचे प्रतीक आहे, टिकटॉक डान्ससाठीचा स्टेज नाही.” तर दुसऱ्या एका युजरने आपल्या आजोबांच्या युद्धातील बलिदानाचा दाखला देत या कृत्याचा निषेध केला. या वादामुळे मधू राजूच्या व्यावसायिक आयुष्यावरही परिणाम झाला आहे. मधू राजू’पालो अल्टो नेटवर्क्स’ या सायबर सुरक्षा कंपनीत क्लाउड नेटवर्क सुरक्षा अभियंता म्हणून कार्यरत होता, मात्र या वादानंतर कंपनीलाही सोशल मीडियावर टॅग करण्यात आले. त्यामुळे त्याच्या नोकरीवर संकट येण्याची शक्यता आहे.
या कृत्यामुळे अमेरिकन इमिग्रेशन विभाग आता सक्रिय झाला आहे. अमेरिकन कायद्यानुसार, व्हिसा धारकाने सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन केल्यास किंवा फेडरल स्मारकांच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा व्हिसा रद्द होऊ शकतो. जरी डान्स करणे हा गुन्हा नसला, तरी परवानगीशिवाय राष्ट्रीय स्मारकांवर अशा गोष्टी करणे ‘डिसऑर्डरली कंडक्ट’ या श्रेणीत येऊ शकते. या दबावामुळे मधू राजूने आपले लिंक्डइन आणि इंस्टाग्राम यांसारखी सर्व सोशल मीडिया खाती आणि डान्स स्टुडिओची वेबसाइट बंद केली आहे.
नॅशनल पार्क सर्व्हिसच्या नियमांनुसार, स्मारकांचे पावित्र्य राखणे अनिवार्य आहे. मधू राजूने याप्रकरणी माफी मागितली असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अमेरिकन प्रशासनाने या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी सुरू केली आहे. आगामी काही आठवड्यांत होणाऱ्या औपचारिक सुनावणीनंतरच त्याच्या व्हिसाबाबत आणि हकालपट्टीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.




























































