
फलाटाच्या विरुद्ध दिशेने एक्स्प्रेस पकडताना झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेसाठी उच्च न्यायालयाने पीडिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मंजूर केली.
अनुचित घटनेची व्याख्या या अपघाताला लागू होत नाही. त्यामुळे पीडिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देता येणार नाही, असा दावा मध्य रेल्वेने केला होता. न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हा दावा फेटाळून लावला.
रेल्वेने आपला दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा सादर केलेला नाही, असे नमूद करत न्यायालयाने पीडिताच्या कुटुंबाला 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश रेल्वेला दिले. ही घटना 2011 मध्ये घडली. तेव्हापासून या रकमेवर सहा टक्के व्याजही द्यावे, असेदेखील न्यायालयाने नमूद केले.
लघुशंका ठरले अपघाताचे कारण
पत्नी व मुलासोबत पीडित मेल एक्स्प्रेसने प्रवास करत होता. लघुशंकेसाठी तो फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेलमधून उतरला. अचानक ट्रेन सुरू झाली. धावती ट्रेन पकडताना पीडिताचा तोल गेला व यात त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची रेल्वेने नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात पीडिताच्या कुटुंबाने न्यायालयाचे दार ठोठावले.
धावती ट्रेन पकडताना जीव गेला
हे आत्महत्येचे प्रकरण नव्हते. पीडिताकडे प्रवासाचे तिकीट होते. त्याने लघुशंकेसाठी मेलमधून उतरणे अपेक्षित नाही. ट्रेनमधून उतरण्याचे कारण काहीही असले तरी पुन्हा मेल पकडताना हा अपघात झाला आहे. हा मुद्दा नुकसानभरपाई ठरवताना विचारात घ्यायला हवा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ट्रेनच्या धडकेत मृत्यू झालेला नाही
या पीडिताचा मृत्यू ट्रेनच्या धडकेत झालेला नाही. ट्रेन पकडताना त्याचा जीव गेला. तसा पोलीस रिपोर्ट आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तशी साक्ष दिली आहे, असेही न्या. जैन यांनी नमूद केले.




























































