
वर्धा ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही व सरकारला शेतकऱयांचे काही देणेघेणे नाही. शक्तिपीठ महामार्ग लाडक्या उद्योगपतींसाठी टाकलेले रेड कार्पेट आहे, असा हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर केला.
शेतकऱयांच्या प्रश्नांवर आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कमळनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा कोणाच्याही फायद्यासाठी नसून गडचिरोलीतील खनिज विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून समुद्रकिनाऱयापर्यंत वाहतूक सुलभ करता यावी यासाठी हा महामार्ग केला जात आहे. हा महामार्ग पुंजीपतींसाठी टाकलेले रेड कार्पेट आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील पंत्राटदारांची बिले थकली आहेत, पगार करायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासही सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, अशा परिस्थितीत 88 हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग बनवला जात आहे, असा सवाल सपकाळ यांनी केला.
युद्ध परिस्थितीला तोंड देण्यास मोदी सरकार अपयशी
आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल वा गॅसच्या किमती कमी झाल्या तर त्याचा फायदा सरकार ग्राहकांना देत नाही, मात्र तुटवडा निर्माण झाला की कांगावा करत पुंजीपतीसाठी भाववाढ करते, त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होतो. युद्धामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.


























































