
आयसीसीने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर केली असून, जगज्जेत्या ‘टीम इंडिया’तील चार खेळाडू या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पंडय़ा व जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे.
टी-20 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमकडे सोपवण्यात आले आहे. स्पर्धेत सर्वाधिक 383 धावा करणाऱया पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे. ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या सॅमसनने पाच डावांत 321 धावा करत प्रभावी कामगिरी केली. त्याने वेस्ट इंडीज व इंग्लंड या संघांविरुद्ध ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला, तर अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 89 धावांची खेळी केली, जी टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ठरली. ईशाननेही 317 धावा करत हिंदुस्थानी फलंदाजीला भक्कम आधार दिला. हार्दिक पंडय़ाने अष्टपैलू कामगिरी करत दोन अर्धशतके आणि 9 विकेट घेतले तसेच बुमराने 8 सामन्यांत 14 विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली.
आयसीसीचा टी-20 वर्ल्ड कप संघ ः साहिबजादा फरहान (पाकिस्तान), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमरा (सर्व हिंदुस्थान), एडन मारक्रम (कर्णधार, द.आफ्रिका), विल जॅक्स (इंग्लंड), जेसन होल्डर (विंडीज), लुंगी एनगिडी (द.आफ्रिका), आदिल राशीद (इंग्लंड), ब्लेसिंग मुझरबानी (झिम्बाब्वे).
मुख्यमंत्र्यांकडून विशेष अभिनंदनाचा ठराव
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडत संघाच्या कामगिरीचे काwतुक केले. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या कामगिरीबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादव तसेच प्रशिक्षक गौतम गंभीर यांसह सर्व संघाचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. आयसीसी आणि बीसीसीआय यांच्या कार्याचाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. विधानसभेच्या वतीने हिंदुस्थानी संघाला अभिनंदनाचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संमत केल्याचे घोषित केले.




























































