
महिलांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या शिवीगाळ करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथे महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत एक धाडसी आणि आदर्श निर्णय घेण्यात आला. गावात कोणीही आई-बहिणीवरून शिवी दिल्यास संबंधित व्यक्तीकडून थेट 500 रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कचरा टाकणाऱ्यांवरही दंडाची टांगती तलवार असणार आहे
ग्रामीण भागातील सार्वजनिक व्यवहारांत सहजपणे वापरल्या जाणाऱ्या असभ्य भाषेला चाप लावण्यासाठी कोळगाव ग्रामपंचायतीने थेट खिशाला कात्री लावणारा निर्णय घेत एक नवा पायंडा पाडला आहे. विशेष म्हणजे, केवळ तोंडी आदेश न राहता, व्हिडीओ पुराव्यानिशी हा दंड वसूल करण्याचा अधिकारही ग्रामसभेने स्वतःकडे राखून ठेवला आहे. या ग्रामसभेस सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच विलास शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे, अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. 8) कोळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अंगणवाडीसेविका शकुंतला देशमुख होत्या. अध्यक्षपदाची सूचना अंगणवाडीसेविका विद्या लगड यांनी मांडली, तर त्यास मीना भापकर यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे यांनी विषयपत्रिका वाचून दाखवली. ग्रामसभेत प्रथम शेती व इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर महिलांनी गावातील सामाजिक वातावरणावर चर्चा करत महिलांवरून होणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून आई-बहिणीवरून शिवी देणाऱ्याचा व्हिडीओ पुरावा ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास त्या व्यक्तीकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, असा ठराव करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी घेतलेला हा निर्णय ग्रामस्थांनीही उचलून धरला.
स्वच्छतेसाठी 100 रुपयांचा दंड आकारण्यात येणार
याच बैठकीत गाव स्वच्छ ठेवण्यासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. घर, दुकान किंवा परिसरात कचरा टाकल्याचा फोटो ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास संबंधित व्यक्तीकडून 100 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.


























































