सत्य हे आहे की, सरकारनेच लोकसभा अध्यक्षांवर ‘प्रेशर’ टाकले, त्यांचे स्वातंत्र्य हिरावले; प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यातच आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अविश्वास ठरावाचा मुद्दा चर्चेत आहे. विरोधक अध्यक्षांवर दबाव टाकत असल्याची टीका सरकार करत आहे. मात्र, सरकारच्या या टीकेला काँग्रेस नेत्या, खासदार प्रियंका गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सरकारने लोकसभा अध्यक्षांवर दबाव टाकत त्यांचे स्वातंत्र्य हिरावले आहे. आता अध्यक्षांवर विरोधक दबाव टाकत असल्याची टीका करताहेत. त्यांनीच अध्यक्षांवर दबाव टाकत त्यांचे स्वातंत्र्य हिरावले, मात्र, टीका विरोधकांवर करत आहे. त्यांनी सर्व सार्वजनिक संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आणले आहे. देशाची लोकशाही ज्या संस्थांवर अवलंबून आहे त्या संस्था वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. भाजप सर्व संस्थावर दबाव आणत आहे. या स्रव संस्था वाचवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे भाजप सहन करू शकत नाही, म्हणून ते सभागृहाचे लक्ष या मुद्द्यांपासून विचलित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, देशाची जनता समजूतदार आहे. त्यांना सत्य काय आहे, ते समजते. माझी आजी इंदिरा गांधी म्हणायची, कोणी कितीही बनाव केला किंवा खोटी प्रतिमा सादर केली तरी देशातील लोकांना सत्य कळतेच, त्यामुळे लवकरच या सरकारचा बनाव उघड होईल आणि जनतेला सत्य समजेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे जगाची परिस्थिती बिकट होत आहे. येणाऱ्या काळात हे संकट आणखी बिकट होणार आहे. मोदी सरकारने व्यापार करार करण्यासाठी अमेरिकेसमोर झुकले आहे. त्यातच आता युद्ध सुरू झाले आहे. यामुळे देशासमोरील संकट आणखी वाढेल, असा इशाराही प्रियंका गांधी यांनी दिला.