
देशात इंधन टंचाई आणि एलपीजीच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशांतर्गत एलपीजी उत्पादनात १० टक्के वाढ केली असून, उद्योगांना पुरवला जाणारा गॅस आता घरगुती वापरासाठी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे देशात इंधन संकट ओढवू नये, यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तेल शुद्धीकरण कारखान्यांना (रिफायनरीज) एलपीजी उत्पादनात तातडीने १० टक्के वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्पादनात वाढ करण्यासोबतच, औद्योगिक क्षेत्रासाठीच्या गॅस पुरवठ्यात कपात करून तो साठा घरगुती सिलिंडरसाठी वापरला जाणार आहे. यामुळे कारखान्यांच्या इंधन वापरावर मर्यादा येणार असल्या तरी, सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, आगामी काही आठवडे हा विशेष पुरवठा नियम लागू राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता गरजेपुरताच गॅस बुक करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

























































