जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळला, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरून (LoC) घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा मोठा प्रयत्न हिंदुस्थानी लष्कराने यशस्वीपणे हाणून पाडला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले असून, सीमाभागात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नौशेरा सेक्टरमधील सीमावर्ती भागात काही संशयास्पद हालचाली जवानांच्या निदर्शनास आल्या होत्या. खराब हवामान आणि भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत दहशतवादी हिंदुस्थानी सीमेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सीमेवर तैनात असलेल्या सतर्क जवानांनी तात्काळ या आव्हानाला प्रत्युत्तर दिले. जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. या जोरदार चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.

या घटनेनंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून अतिरिक्त कुमक पाचारण करण्यात आली आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागात घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.