
दापोली आणि मंडणगड तालूक्यातील एकुण ९ गावांच्या समुद्रकिनाऱ्यावर २९२ कासवांची घरटी उभारण्यात आलेली होती. या घरटयांमध्ये एकुण ३० हजार ९९१ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातून १० मार्चपर्यंत एकुण ४६६ कासवांची पिल्ले समुद्राच्या पाण्याकडे सुरक्षितरित्या झेपावली आहेत. हे वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकणच्या कामगिरीचे खरोखरच मोठे यश म्हणावे लागेल.
मंडणगड तालुक्यातील वेळास आणि दापोली तालुक्यातील केळशी ते दाभोळ पर्यंतच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी अन उन्हाळ्यात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवाची वीण होते. दुर्दैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंडयांची हत्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही वर्षापूर्वी होत असे. त्यामुळे कांदळवन विभागाने कासव मित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दापोली आणि मंडणगड तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले.
दापोली तालुक्यातील दाभोळ ते मंडणगड तालुक्यातील वेळास या कासवांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारपट्टी दरम्यान २९२ उभारलेल्या घरटयांमध्ये आतापर्यंत तब्बल ३०९९१ इतकी अंडी संरक्षित करण्यात कांदळवन विभागाला यश आले आहे. या संरक्षित केलेल्या घरट्यांमधून ४६६ पिल्ले समुद्राकडे समुद्राच्या पाण्यात सुरक्षितपणे सोडण्यात आली.
ऑलिव्ह रिडले सागरी कासव हे निसर्ग संतुलनात महत्वाची कामगिरी पार पाडत असतात अशा या निसर्ग संतुलनाची महत्वाची कामगिरी पार पाडणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवरील मंडणगड तालुक्यातील वेळास येथील समुद्र किनाऱ्यावर २२ घरटे उभारण्यात आली आहेत यामध्ये २९६० अंडी संरक्षित केली असून आतापर्यंत ६३ पिल्ले समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली आहेत.



























































