लोखंडी सिलिंडर देऊन प्लॅस्टिकचा घेण्याची सक्ती; गॅस संपला… बुकिंग होईना… सिलिंडर मिळेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
LPG Gas Shortage in Ahilyanagar Agencies Forcing 10kg Plastic Cylinders

‘गॅस संपला आहे’ असे सांगत नवीन सिलिंडर घेण्यासाठी काही एजन्सीकडून 10 ते 15 दिवसांची अट लावली जात आहे. ऑनलाइन बुकिंगचे सर्व पर्याय बंद झाले आहेत. एजन्सीकडूनही नवीन बुकिंग घेतले जात नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातच एजन्सीकडून 14.2 किलोंचा एलपीजी लोखंडी सिलिंडर जमा करून 10 किलोचा नवीन प्लॅस्टिक सिलिंडर घेण्याची सक्ती केली जात आहे. या नवीन प्लॅस्टिक सिलिंडरसाठीही अतिरिक्त अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर जास्तीचा भुर्दंड पडत आहे.

अमेरिका आणि इस्रायलचे इराणविरोधात युद्ध सुरू आहे. परिणामी भारताकडे येणारा इंधन, वायू पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. गॅस कंपन्यांनी सिलिंडर बुकिंगसाठी निर्बंध लागू केले आहेत. नवीन सिलिंडर बुक करण्यासाठी काही कंपन्यांनी किमान 21 दिवसांचा, तर काही ठिकाणी हा कालावधी 25 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

भारत पेट्रोलियमचे जिह्याचे समन्वयक राजेशकुमार मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता सर्वत्र गॅस पुरवठा सुरळीत असून, अजून टंचाईची परिस्थिती नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, एजन्सीकडून नागरिकांची अडवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अनेक गॅस एजन्सीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत असून, सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान, घरगुती 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

भारत पेट्रोलियमकडून अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून गॅसपुरवठा सुरू आहे. पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा सुरळीत सुरू असताना सिलिंडरसाठीच अडवणूक का, असा सवाल ग्राहक करीत आहेत.

प्लॅस्टिक सिलिंडरमध्ये गॅस मिळतो; पण लोखंडी सिलेंडर नाही

भारत पेट्रोलियम कंपनीकडून 10 किलोचा प्लॅस्टिक सिलिंडर बाजारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनेक एजन्सीकडून जुना लोखंडी सिलिंडर जमा करून घेतला जात असून, त्याबदल्यात नवीन प्लॅस्टिक सिलिंडर दिला जात आहे. विशेष म्हणजे जुन्या लोखंडी सिलिंडरसाठी ग्राहकांकडून अनामत रक्कम भरून घेण्यात आली होती. तरीही नवीन प्लॅस्टिक सिलिंडरसाठी पुन्हा अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे. ज्या ग्राहकांकडे दोन लोखंडी सिलिंडर असतील, त्यांना दोन्ही सिलिंडर जमा करण्याची सक्ती केली जात आहे. या दोन्ही सिलिंडरच्या बदल्यात नवीन एक प्लॅस्टिक सिलिंडर दिले जाते. प्लॅस्टिक सिलिंडर देण्यासाठी गॅस उपलब्ध आहे, मग लोखंडी सिलिंडर देण्यासाठी का नाही, असा सवाल ग्राहक करीत आहेत.