
उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठित शिक्षणसंस्था Indian Institute of Technology Kanpur येथे विद्यार्थ्यांच्या झोपेच्या समस्येवर एक वेगळाच अभ्यास सुरू करण्यात आला आहे. वर्गात लेक्चर दरम्यान अनेक विद्यार्थी वारंवार झोपताना दिसत असल्याने प्राध्यापकांनी यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी संशोधन हाती घेतले आहे.
एका प्राध्यापकाच्या लक्षात आले की विशेषतः सकाळच्या पहिल्या वर्गात अनेक विद्यार्थी झोपलेले दिसतात. सुरुवातीला ही गोष्ट सामान्य समजून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र सातत्याने विद्यार्थी हे झोपताना आढळले. त्यामुळेच नंतर यावर गंभीरपणे संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संशोधनांतर्गत विद्यार्थ्यांना रात्री झोपताना वसतिगृहातील वातावरण किती आरामदायी आहे, याचा सखोल अभ्यास करण्यात आला. अभ्यासांती असे लक्षात आले की, वसतिगृहाची रचना आणि एकूणच तिथले वातावरण हे विद्यार्थ्यांच्या झोपेसाठी फारसे पूरक नव्हते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये नीट झोप येत नव्हती. त्यामुळेच झोप न झाल्याने विद्यार्थी लेक्चर दरम्यान झोपत असत.
सध्याच्या घडीला संशोधन करणारे पथक वसतिगृहातील हवा, तापमान आणि रुममधील इतर परिस्थितीचा देखील अभ्यास करत आहेत. हवा खेळती नसल्याने, तसेच रुममधील वातावरण तितकेसे पूरक नसल्याने, विद्यार्थ्यांच्या झोपेवर खूप परीणाम होत असल्याचे, निदर्शनास आले आहे.
सुरुवातीला हा छोट्या पायलट प्रकल्पाच्या स्वरूपात सुरू करण्यात आला होता. मात्र त्यातून मिळालेल्या प्राथमिक निरीक्षणांनंतर आता तो अधिक व्यापक स्वरुपात हा अभ्यास करण्यात येत आहे.
संशोधनाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना प्रकल्पाशी संबंधित डॉ. अनुभा गोयल यांनी सांगितले की, “झोपेचे वातावरण विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि अभ्यासक्षमतेवर महत्त्वाची भूमिका बजावते, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही पुरेसा डेटा गोळा करत आहोत. हा संबंध स्पष्ट झाला तर भविष्यात वसतिगृहे आणि निवासी इमारतींची रचना अधिक चांगली करता येईल.”
या अभ्यासातून मिळणारे निष्कर्ष भविष्यात शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृहांच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

























































