
प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी यांच्या कथांवर आधारित ‘महोगाथा’ हे आगळेवेगळे नाटक मराठी रंगभूमीवर येत आहे. ‘काली बिल्ली प्रॉडक्शन्स’ निर्मित या नाटकाचे लेखन व निर्मिती सावित्री मेधातुल यांनी केली असून दिग्दर्शन ‘मॅड सखाराम’ फेम मंगेश सातपुते यांचे आहे. नेपथ्य व वेशभूषा सुमित पाटील, संगीत विक्रम होता यांचे तर प्रकाशयोजना विलास हुमणे यांनी केली आहे.
या नाटकात हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातुल या कलाकारांच्या भूमिका आहेत. समाजमनाचा आरसा दाखवणारी ही नाट्यकृती सध्याच्या काळातील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करते. सावित्री मेधातुल यांनी यापूर्वी लावणी आणि लोककलेच्या वारशावर काम केले असून ‘महोगाथा’मधून त्या वेगळा सामाजिक विषय रंगभूमीवर आणत आहेत.
नाटकाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून रंगमंचाबरोबरच इतर उपलब्ध जागांमध्येही ते सादर करता येईल अशी त्याची मांडणी केली आहे. मनोरंजनासह विचार करायला भाग पाडणारे हे नाटक आहे. ‘महोगाथा’चा शुभारंभाचा प्रयोग 13 मार्च रोजी रात्री 8 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील मिनी थिएटरमध्ये होणार आहे.





























































