नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब; गॅस टंचाईविरोधी आंदोलनाने संसद भवन दणाणले, इंडिया आघाडीच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारात चुली मांडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धामुळे देशभरात निर्माण झालेल्या गॅस तुटवडय़ाचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी मोदी सरकारला घेरले. सरकारच्या ‘अमेरिका शरण’ परराष्ट्र धोरणावर आसूड ओढले. महिला खासदारांनी संसदेच्या आवारात चुली मांडल्या. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती असताना चकार शब्द न काढणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात या वेळी तुफान घोषणा घुमल्या. नरेंदर भी गायब, सिलिंडर भी गायब… नाम नरेंदर, काम सरेंडर… अशी घोषवाक्ये असलेल्या फलकांनी देशाचे लक्ष वेधून घेतले.

इराण-अमेरिका युद्धानंतर आखाती देशांतील सागरी व हवाई वाहतूक पुरती ठप्प झाली आहे. गॅसअभावी हॉटेल आणि इतर अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण असून गॅस सिलिंडरसाठी हाणामाऱया होत आहेत. महागाई वाढली आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे. देशातील या स्थितीवरून विरोधकांनी संसदेत आज जोरदार आवाज उठवला.

दुसरा सिलिंडर 45 दिवसांनीच बुक होणार

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी सिलिंडर बुकिंगचा नवा नियम आज जाहीर केला. त्यानुसार, ग्राहकांना नव्या सिलिंडरच्या बुकिंगसाठी 45 दिवस वाट पाहावी लागणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांच्या अंतरानंतर सिलिंडर बुक करता येणार आहे.