वसईतील धक्कादायक प्रकार, मासळीवर घोंगावणाऱ्या माश्या हाकलण्यासाठी फवारले विषारी हिट; ग्राहकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मासळीवर घोंगावणाऱ्या माश्या हाकलण्यासाठी एका मासळी विक्रेत्याने मासळीवर आणि आजूबाजूला झुरळ मारण्याचे लाल हिट हे विषारी औषध फवारल्याचा प्रकार शहरातील नवजीवन परिसरात उघडकीस आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळला जात असलेला हा जीवघेणा खेळ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्राहकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या मासळी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

वसई पूर्व भागातील नवजीवन परिसरात असलेला एक मच्छी विक्रेता आपले मासे विकत असताना मासळीवर बसणाऱ्या माश्या किंवा कीटक घालवण्यासाठी चक्क झुरळ मारण्याच्या विषारी स्प्रेचा (लाल हिट) वापर करीत असल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा विक्रेता ग्राहकांच्या आरोग्याची पर्वा न करता बिनधास्तपणे मासळीवर विषारी फवाऱ्याचा मारा करीत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ‘लाल हिट’ हे झुरळ आणि इतर कीटक मारण्यासाठी वापरले जाणारे एक अत्यंत विषारी कीटकनाशक आहे. यातील रसायने मानवी शरीरासाठी घातक आहेत. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे. असे असतानाही हा मासे विक्रेता स्प्रे फवारून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.