जय भवानी, जय शिवाजी… गगनभेदी जयघोष! भव्यदिव्य शिवराय संचलनात हजारो शिवसैनिक सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक उत्साहात आयोजित केलेल्या भव्यदिव्य शिवराय संचलनामुळे शुक्रवारी फोर्ट परिसरात पुनश्च शिवकाल अवतरला. ढोल-ताशांचा गजर, लेझीम, तुतारींचा आवाज आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय बनले. सोहळय़ात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सदस्य आणि शिवसैनिक असे हजारो मावळे सहभागी झाले. 

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारातून स्थापन झालेल्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मागील 50 वर्षे अखंडितपणे शिवराय संचलन केले जात आहे. यंदाही त्याच पारंपरिक आणि प्रचंड उत्साहात शिवराय संचलन पार पडले. सायंकाळी 5 वाजता हॉर्निमल सर्कल येथून संचलनाचा शुभारंभ झाला. शिवसेना नेते व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शिवराय संचलनाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी शिवसेना नेते, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, उपनेत्या ज्योती ठाकरे, आमदार सुनील शिंदे, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सूरज चव्हाण, आमदार महेश सावंत, अनंत(बाळा) नर, मनोज जामसुतकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, आशीष चेंबूरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर, अरुण दुधवडकर, प्रमोद सावंत, संपदा मयेकर, रमाकांत रहाटे आदी उपस्थित होते. भारतीय रिझर्व्ह बँक अमर बिल्डिंग येथे उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुढील भव्य शिवराय संचलन सोहळय़ात प्रमुख बँका तसेच सरकारी आस्थापनांच्या प्रवेशद्वारांवर शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सोहळय़ात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आस्थापनांमधील कर्मचारी, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

सोहळा यशस्वी करण्यासाठी हेमंत गुप्ते, प्रदीप बोरकर, अनिल चव्हाण, उल्हास बिले, दिनेश बोभाटे, उमेश नाईक, शरद जाधव, सुधाकर नर, शरद एक्के, विजय अडसुळे, बाळासाहेब कांबळे, विलास जाधव, अजय गोयजी, श्रीराम विश्वासराव, हेमंत रासम, संदीप गावडे, तुकाराम गवळी, प्रवीण हाटे, मयूरेश सावंत, श्याम परब, महेश शिवडेकर, राजन तांडेल आदींनी विशेष मेहनत घेतली.

हुतात्मा स्मारक आणि शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळय़ाला अभिवादन

संचलन मार्गावरील हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणा घुमल्या. यावेळी मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

हॉर्निमल सर्कल ते गेट वे भगवेमय वातावरण

शिवराय संचलनामुळे हॉर्निमल सर्कलपासून ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा मार्ग जागोजागी लावलेले भगवे झेंडे, पताका आणि बॅनरमुळे भगवामय झाला होता. फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या लॉरीमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ठिकठिकाणी फुले वाहून अभिवादन करण्यात आले. संचलनाचा समारोप गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन करण्यात आला. ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

मराठमोळी संस्कृती अन् जणू ‘वारी’चे मंगलमय चैतन्य

शिवराय संचलनात भगव्या टोप्या, फेटे, गमजे घालून पुरुष कार्यकर्ते तसेच भगव्या नऊवारी साडय़ा परिधान करून महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. फुलांनी सजवलेली शिवपालखी, वारकरी भजनपथक तसेच दांडपट्टा, ढाल तलवार, लाठीकाठी, बाराबनाटी, चौरंग चक्र यांसारख्या शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, ढोलताशा पथक, नाशिक बाजा, लेझीम पथक असा प्रचंड उत्साह संचारला होता. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…’ अशा एकसूर आवाजात वारकरीही तल्लीन झाले होते. त्यामुळे जणू ‘वारी’ निघाल्याचे मंगलमय वातावरण होते. संचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.