
अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जेएनपीए बंदरात मागील १३ दिवसांत केळी, द्राक्ष, डाळिंब, कांद्याचे १ हजार २०० कंटेनर अडकून पडल्यानंतर शिपिंग कंपन्यांनी निर्यातदारांची लुटमार सुरू केली आहे. पूर्वी एक कंटेनर हाताळण्यासाठी ८०० डॉलर्स घेतले जायचे. मात्र आता हा खर्च थेट आठ हजार डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आला आहे.
युद्ध परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरातून आखातातील निर्यात पुरती ठप्प झाली आहे. जेएनपीए व सीमा शुल्क विभागाने निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी बीटीए व अन्य काही योजना अमलात आणल्या आहेत. मात्र त्यामुळे निर्यातदारांना दिलासा मिळाला नाही. जेएनपीए बंदराच्या बाहेरील रस्त्यावर नाशवंत मालाचे अद्यापही ४५० कंटेनर उभे आहेत. बंदरातही रिफर कंटेनरसाठी प्लगची कमतरता भासत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, अशी माहिती रिफर कंटेनर ट्रान्सपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली.


























































