
डिजिटल अटकेच्या नावाखाली महिलेची फसवणूक प्रकरणात पश्चिम सायबर पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर ओटीपी पुरवणाऱ्या टोळीला गजाआड केले. अभिजित शिल, शंतनू सेन, सुब्राता बर्मन, जॉयदेब रॉय अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन, 300 हून अधिक सिमकार्ड, लॅपटॉप, स्टॅम्प, रिकामे सिमकार्ड पाकीट, राउटर, बनावट फिंगर प्रिंट आणि काही पैसे जप्त केले आहेत.
तक्रारदार या फॅशन डिझायनर असून त्या अंधेरी येथे राहतात. दोन वर्षांपूर्वी त्याना एका नंबरवरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्याने तो ट्रायमधून बोलत असल्याचे भासवले. त्याच्या नंबरवरून अनेकांना फसवणुकीचे मेसेज जात असल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने त्यांना आणखी एका नंबरवरून फोन आला. त्याने तो दिल्ली सायबर क्राईम विभागातून बोलत असल्याचे भासवले. त्याने फोनवर चर्चा केल्यानंतर आणखी एकाने त्यांना फोन केला. त्याने तो आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले. मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात 90 दिवस पोलीस कोठडीत राहावे लागेल असे सांगण्यात आले. जर ती कोठडी नको असल्यास एक अर्ज करावा लागेल. त्या अर्जानुसार 7 दिवस डिजिटल अटकेमध्ये राहावे लागेल अशा भूलथापा मारल्या. डिजिटल अटकेदरम्यान कोणाशी संभाषण करता येणार नाही असे सांगून काही कागदपत्रे पाठवली.
अटकेची भीती दाखवून बँक खात्याची माहिती घेतली. ठगाने त्यांच्याकडून 33 लाख 50 हजार रुपये उकळले. फसवणूकप्रकरणी त्याने पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. कंबोडियामधील सायबर ठगांना काही जण व्हॉट्सअॅपवर ओटीपी पाठवत असल्याचे समजले.



























































