
उन्हाच्या तडाक्यापाठोपाठ ठाण्यात प्रदूषणाचादेखील पारा वाढला आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक थेट 269 वर पोहोचला असल्याने आता श्वास घेणेही कठीण झाले आहे. झाडांची कत्तल, धूळ, राडारोडा, वाहतूककोंडीने नागरिक हैराण झाले असताना प्रदूषणमुक्त ठाणे अशी घोषणा करणारी ठाणे पालिका सपशेल फेल ठरली आहे. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने उच्चांक गाठला असून नागरिक वाढत्या प्रदूषणाने अक्षरशः घुसमटले आहेत.
एकेकाळी तलावांमुळे आणि हिरवळीमुळे प्रसिद्ध असलेले ठाणे शहर आता जगातील अतिप्रदूषित शहरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे. ठाणे हे तलावांचे शहर असून शहरात वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे तसेच विविध विकासकामांमुळे आणि धूळ, धुराच्या व्याप्तीने शहरात वायुप्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. दिवाळीनंतर ठाण्याची हवा अत्यंत खराब झाल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
हे आहेत हॉटस्पॉट
नितीन कंपनी, किसननगर नाका, शास्त्री नगर, बाळकुम, गावदेवी नाका, लोकमान्यनगर, विटावा, कोर्टनाका, कापूरबावडी नाका, शिळफाटा, दिवा डम्पिंग ग्राऊंड, जांभळी नाका, इंदिरानगर, वर्तकनगर, ढोकाळी मार्केट, कासारवडवली मार्केट, कळवा भाजी मार्केट, मुंब्रा स्टेशन, दिवा स्टेशन, कोपरी, तीन हात नाका, सॅटिस, नौपाडा आदी भागांचा समावेश आहे.



























































