
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे काही देशांचे हवाई क्षेत्र बंद झाले आहे. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना पर्यायी मार्ग वापरावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने एअर इंडियाच्या वैमानिकांच्या उड्डाण आणि ड्युटी वेळेच्या नियमांमध्ये तात्पुरती सवलत दिली आहे. ही सवलत १३ मार्चपासून लागू झाली असून ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. मध्यपूर्वेत हवाई मार्गांवर निर्बंध आल्याने उड्डाणांचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर दोन वैमानिकांसह चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांसाठी ड्युटी मर्यादा वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आता वैमानिकांचा कमाल उड्डाण वेळ १ तास ३० मिनिटांनी वाढवून ११ तास ३० मिनिटे करण्यात आला आहे. तर फ्लाइट ड्युटी कालावधी (हजर होण्यापासून विमान बंद होईपर्यंत) १ तास ४५ मिनिटांनी वाढवून १४ तास ४५ मिनिटे करण्यात आला आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, लांब मार्ग आणि वाढलेल्या उड्डाण वेळेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी व्यवस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. या सवलतीदरम्यान सुरक्षिततेवर परिणाम होऊ नये म्हणून एअर इंडियाने काही उपाय लागू केले आहेत.
वैमानिकांसाठी विशेष प्री-फ्लाइट ब्रीफिंग तसेच नियामकांसोबत सतत ऑपरेशनल मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. त्याबरोबर क्रूला अतिरिक्त ४ तासांची विश्रांती देण्यात येणार आहे. याबरोबरीने रोस्टर नियोजनातील ३० मिनिटांचा बफर नियमातून तात्पुरती सूट देण्यात आली आहे. ही सवलत फक्त मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या विशिष्ट उड्डाणांनाच लागू असेल.
दरम्यान फेडरेशनने मात्र या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संघटनेच्या मते, दोन वैमानिकांसह चालणाऱ्या उड्डाणांमध्ये ड्युटी वेळ वाढवल्यास थकवा वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याचा उड्डाण सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. संघटनेने असा इशारा दिला आहे की, ड्युटी कालावधी १३ तासांच्या पुढे गेल्यास वैमानिकांची सतर्कता आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे नियम शिथिल करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे काही हवाई क्षेत्र बंद झाल्याने जगभरातील विमान कंपन्यांना मार्ग बदलावे लागत आहेत. विशेषतः हिंदुस्थान – युरोप आणि हिंदुस्थान-उत्तर अमेरिका मार्गांवरील उड्डाणांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे विमान कंपन्यांना ऑपरेशनल व्यवस्थापनात मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

























































