
हिंदुस्थानची दिग्गज माजी खेळाडू मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हिंदुस्थानच्या वाढत्या वर्चस्वावर आनंद व्यक्त केला आहे. मिताली म्हणाली की, हिंदुस्थानी क्रिकेटला जागतिक स्तरावर अव्वल स्थानी पाहण्याचे तिचे स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत पुरुष, महिला आणि कनिष्ठ (ज्युनिअर) संघांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंदुस्थानी क्रिकेटने एक मोठी उपलब्धी गाठली आहे.
BCCI च्या एका सन्मान सोहळ्यादरम्यान मिताली राजने हिंदुस्थानी क्रिकेटच्या यशाचे कौतुक केले. ती म्हणाली, “गेल्या दोन-तीन वर्षांत हिंदुस्थान क्रिकेटने प्रत्येक स्तरावर दमदार खेळ केला आहे. महिला आणि पुरुष संघांसोबतच 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनीही चमकदार कामगिरी केली आहे. एक माजी क्रिकेटपटू म्हणून हिंदुस्थानचा हा दबदबा पाहताना मला खूप अभिमान वाटतो.” असं मिताली राज म्हणाली.
गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानी संघाने अनेक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय किताब जिंकले आहेत. टीम इंडियाने 2024 आणि 2026 चा पुरुष टी-20 विश्वचषक जिंकून आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे, तर महिला संघानेही पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले आहे. याशिवाय, 19 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या संघांनीही जागतिक विजेतेपद मिळवून देशाची मान उंचावली आहे, ज्यामुळे हिंदुस्थान क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे दिसून येते.

























































