ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशन्ट डेड अशी परिस्थिती, LPG तुटवड्या संदर्भात संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-इस्रायल युद्धाच्या सावटाखाली सध्या संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. एकीकडे गॅससाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना, दुसरीकडे केंद्र सरकार मात्र पुरवठा मुबलक असल्याच्या दावा करत आहे. सरकारच्या या भूमिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “ऑपरेशन सक्सेसफुल, सर्जरी सक्सेसफुल पण पेशंट डेड” अशी एलपीजी गॅसच्या तुटवड्या संदर्भातील परिस्थिती असल्याचा टोला सरकारला लगावला आहे.

सिलिंडरच्या तुटवड्यामुळे व्यावसायिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मुंबईतील जवळपास 40 टक्के रेस्टॉरंट्स बंद झाली असून, शाळांच्या कॅन्टीनलाही गॅस मिळेना झाला आहे. इतकेच नव्हे तर मुंबईच्या रस्त्यावरील 50 टक्क्यांहून अधिक वडापावच्या गाड्या गॅसअभावी बंद पडल्या आहेत. तर वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली रांगांची चित्रे काय ‘एआय’ने (AI) तयार केली आहेत का? असा संतप्त सवाल केलाआहे.

पंतप्रधानांच्या मतदारसंघातल्या मंदिरातील अन्नछत्र बंद

सिलिंडर टंचाईचा सर्वाधिक फटका धार्मिक स्थळांना आणि अन्नछत्रांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या काशीमध्ये, जिथे गेल्या 40 वर्षांपासून लाखो भक्तांना अन्नदान केले जाते, तेथील अन्नपूर्णा देवीचे अन्नछत्र गॅसअभावी बंद पडले आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्येही प्रसादाच्या लाडूंमध्ये कपात करण्यात आली असून, दोनऐवजी एकच लाडू दिला जात आहे. स्वतःला हिंदुत्ववादी आणि धर्मवादी म्हणवणाऱ्या सरकारने किमान देवस्थाने, शाळा, आश्रमशाळा आणि हॉस्टेल्सना तरी विनाविलंब गॅस पुरवठा करावा. देशात एलपीजीचा तुटवडा असताना तुम्ही खोटे बोलून देशाची दिशाभूल करत आहात, परिस्थिती चिंताजनक असतानाही सरकार वस्तुस्थिती नाकारत आहे, अशा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.