
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून साईनगर शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर एका हुल्लडबाजाने दगडफेक केल्याची घटना कल्याण पत्रीपुलाजवळ घडली. दगडफेक करणारा तरुण व्हिडीओ बनवत होता. यामध्ये एक्स्प्रेसच्या चार डब्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला अटक केली. सनी कांबळे असे अटक आरोपीचे नाव आहे.
साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस कल्याणजवळील पत्रीपुलाजवळ आली असता गाडीच्या काचेवर दगड आदळले अचानक झालेल्या या प्रकारामुळे खिडकीजवळ बसलेले प्रवासी घाबरले. या घटनेमुळे एक्स्प्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. फुटलेल्या काचांच्या एक्स्प्रेससोबत हुल्लडबाड तरुण मोबाईलमध्ये सेल्फी काढत होता. यानंतर तो तरुण रेल्वे मार्गातून पळून गेला. दक्ष प्रवाशांनी याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि कल्याण, डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरपीएफ पोलिसांनी रेल्वे मार्गाजवळील आजूबाजूचा परिसर पिंजून काढला आणि दगडफेक करणाऱ्या सनीला अटक केली. कल्याण सुरक्षा बल पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला रेल्वे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. आधारवाडी तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.




























































