धडाकेबाज इशानचे कर्णधारपदी प्रमोशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्ड कपमधील घणाघाती कामगिरीमुळे इशान किशनचे क्रिकेट पुन्हा एकदा ट्रकवर आले आहे. आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादने सुरुवातीच्या सामन्यांसाठी इशान किशनचीप्रभारी कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे अनुपलब्ध असल्याने किशन संघाची धुरा सांभाळणार आहे.

फ्रेंचायझीने सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना सांगितले की, पॅट कमिन्स पूर्णपणे फिट होईपर्यंत किशन कर्णधार आणि अभिषेक शर्मा  उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळतील. हैदराबादचा यंदाच्या हंगामातील पहिला सामना 28 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. कमिन्स सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत असून तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. ही दुखापत त्याला अॅशेस मालिकेपूर्वार् झाली होती.

दरम्यान, इशान किशनला कर्णधारपदाचा अनुभव असून त्याने आपल्या नेतृत्वाखाली झारखंडला सईद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्या स्पर्धेत त्याने 197.33 च्या स्ट्राइक रेटने 517 धावा करत प्रभावी कामगिरी केली होती.

मात्र आयपीएलच्या मागील हंगामात किशनचा फॉर्म चढउताराचा राहिला होता. सुरुवातीला शतक आणि शेवटी नाबाद 94 धावा करत चमक दाखवली, पण मधल्या टप्प्यात त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवला. आता हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.