
लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांची डिजिटल पर्यायांद्वारे तिकिटे काढताना अनेकदा ‘ट्रांजेक्शन’ मधेच ‘फेल’ होते. तिकीट न मिळूनही खात्यातून पैसे कट होतात. ते पैसे परत मिळवणे आता सोपे होणार आहे. पश्चिम रेल्वेने ‘सरल रिफंड सेवा’ ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. याअंतर्गत प्रवासी तिकीट खिडक्या तसेच स्थानकांतील इतर ठिकाणी लावलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून तिकिटाचे पैसे परत मिळवू शकणार आहेत. त्यामुळे स्टेशनचे हेलपाटे वाचणार आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने ही सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत पश्चिम रेल्वेची सर्व उपनगरीय स्थानके आणि सुरतपर्यंतच्या स्थानकांतील एटीव्हीएम व इतर डिजिटल पर्यायांद्वारे काढलेल्या तिकिटाच्या रकमेचा परतावा मिळवता येणार आहे. रेल्वेच्या विविध ऍप्स तसेच एटीव्हीएमवरून तिकीट काढताना ट्रांजेक्शन अर्ध्यावर लटकते. मात्र प्रवाशांच्या खात्यातून पैसे कट होतात. तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे तिकीट रद्द केले जाते. त्या तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांना स्थानकावर जाऊन फॉर्म भरण्याबरोबर वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. ‘सरल’ प्रणालीमुळे हा त्रास वाचणार आहे. प्रवाशांना सरल प्रणालीचा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून फॉर्ममध्ये तपशील भरावा लागणार आहे.
सुरक्षेबाबत पुरेपूर खबरदारी
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागातील 48 टक्के प्रवासी डिजिटल तिकीट खरेदी करतात. तांत्रिक समस्यांमुळे अनेक प्रवाशांना ऑनलाइन तिकीट न मिळताच खात्यातून पैसे कट होतात. असे प्रवासी ‘सरल’ सुविधेचा क्यूआर कोड स्कॅन करू शकतील. या प्रणालीच्या सुरक्षेबाबत पुरेपूर खबरदारी घेतली जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.



























































