30 ते 35 रुपयांने विकल्या जाणाऱ्या कलिंगडची किंमत 6 रुपये, इराण – इस्रायल संघर्षामुळे फळ बागायतदारांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण – इस्रायल संघर्षामुळे आखाती देशांकडे होणाऱ्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून त्याचा थेट फटका वाशी येथील एपीएमसी फळबाजाराला बसला आहे. निर्यात होणारी फळांची कंटेनर परत बाजारात येऊ लागल्याने बाजारात प्रचंड प्रमाणात माल साचला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना नवीन मालासाठी जागा मिळणे कठीण झाले असून उन्हाळी फळांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

कलिंगडच्या दरात सर्वाधिक घसरण झाली असून घाऊक बाजारात टरबूज अवघ्या 6 रुपया प्रति किलो दराने विकले जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी हाच दर 30 ते 35 रुपया प्रति किलो होता.

एपीएमसीतील घाऊक फळ व्यापारी विजय भारद्वाज यांनी सांगितले की, उन्हाळा आणि रमजानमुळे कलिंगडची मागणी वाढेल, असा अंदाज होता. त्यानुसार सोलापूर, सांगली, बीड, लातूर, जळगाव तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कलिंगड बाजारात येत आहे.

सामान्यतः उन्हाळ्यात दररोज सुमारे 100 ट्रक कलिंगड बाजारात येतात. मात्र सध्या 150 ते 200 ट्रक येत असून ते हाताळणे शक्य असले तरी निर्यातीसाठी गेलेली आणि परत आलेली कंटेनर ही मुख्य अडचण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, आखाती देशांकडे जाणारी फळांची कंटेनर युद्धामुळे अडकून पडली होती आणि सुमारे 15 दिवसांनंतर ती पुन्हा बाजारात परत येत आहेत. सध्या 100 ते 200 निर्यात कंटेनर बाजारात परत येत असल्याचे सांगितले जात आहे. या कालावधीत फळांची शेल्फ लाइफ संपल्याने मोठ्या प्रमाणात माल खराब अवस्थेत बाजारात येत आहे.

फळांचा साठा वाढल्याने दर कोसळले असून बाजारात सडलेली कलिंगड फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. टरबूज हे अत्यंत नाशवंत फळ असल्याने खराब होऊ लागल्यानंतर ते फेकून देण्याशिवाय पर्याय नसल्याचे व्यापारी विजय जाधव यांनी सांगितले.

खरबूजाच्या दरातही मोठी घसरण झाली असून 25 ते 30 रुपया प्रति किलो दरावरून ते 12 ते 18 रुपयांवर आले आहे. लिंबाच्या दरातही घट झाली असून 60 ते 80 रुपया प्रति किलोवरून ते 30 ते 50 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

द्राक्ष व्यापारालाही याचा मोठा फटका बसला आहे. निर्यातीसाठी तयार केलेली उच्च दर्जाची द्राक्षे आता स्थानिक बाजारात येत आहेत. त्यामुळे द्राक्षांच्या घाऊक दरात सुमारे 50 टक्क्यांनी घट झाली आहे.

घाऊक व्यापारी सागर देसाई यांनी सांगितले की, युद्धाचा फटका आणि बदलते हवामान या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. निर्यातीसाठी असलेली प्रीमियम द्राक्षे स्थानिक बाजारात येत आहेत, तर अवकाळी परिस्थितीमुळे शेतकरी लवकर काढणी करत आहेत.

सध्या विक्रेते पूर्वी 10 क्रेट्स खरेदी करत असत, मात्र आता ते फक्त 5 क्रेट्स घेत आहेत. त्यामुळे मागणी निम्म्यावर आली असून पुरवठा मात्र शिखरावर आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या परिस्थितीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असून रमजानमुळे चांगल्या दराची अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रायगड येथील शेतकरी शंकर पवार यांनी सांगितले की, सध्या मिळणारे दर वाहतूक खर्चही भागवत नाहीत. ही स्थिती कायम राहिल्यास आम्ही बाजारात माल आणणे बंद करू, असा इशारा त्यांनी दिला.