थकबाकीदारांनी भरला मालमत्ता कर, नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीला नऊ दिवसांत २० कोटींचे लक्ष्मीदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिकेने अभय योजना लागू केल्यापासून नऊ दिवसांमध्ये ५ हजार ७४४ मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या थकबाकीदारांनी २० कोटी १५ लाख १२ हजार ५२७ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. ही योजना येत्या ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी १० मार्च रोजी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभघेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी निर्दिष्ट कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक आहे.

अभय योजना लागू झाल्यापासून नऊ दिवसांच्या काळात ५ हजार ७४४ मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत २० कोटी १५ लाख १२ हजार ५२७ रुपये मालमत्ता कर जमा केला आहे.

महापालिकेच्या मालमत्ता करवसुली मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणावर कर संकलन होत आहे.

काही मालमत्ताधारकांकडून अद्याप थकीत रकमेचा भरणा झालेला नसून अशा मालमत्ताधारकांनी पालिकेच्या ‘अभय योजने’चा लाभघ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे नागरिकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना यामुळे कर भरणे सुलभ होणार आहे. तसेच कामकाजाच्या दिवशी सर्व कर संकलन केंद्रे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.