
नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गाजत असतानाच आता अजितदादांच्या निवासस्थानासमोर जादूटोणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच्याशी अशोक खरातचं कनेक्शन असल्याचा दावा होत असल्याने खळबळ उडाली आहे. अजितदादांच्या घरासमोर जादूटोणा झाला होता. अशोक खरातला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविषयीचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू खरात याची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मध्यंतरी दिवंगत अजित पवार यांच्या घरासमोर जादूटोणा झाल्याचे समोर आले होते. त्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा… https://t.co/XiLhSHAiNx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 20, 2026
याबाबत आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्वीटचा संदर्भ देऊन त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? असे सवाल त्यांनी केले आहेत.
या सर्व गोष्टींचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे.


























































