
इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ जगालाच नाही तर हिंदुस्तानलाही एलपीजी गॅसच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच चिंताजनक विधान केले आहे. मंत्रालयाने स्पष्टपणे कबूल केले आहे की, एलपीजीची स्थिती सध्या अत्यंत गंभीर असून नागरिकांनी आता पर्यायी इंधन व्यवस्थेचा विचार करण्याची वेळ आली आहे.
इराण-इस्रायल युद्धाला २० दिवस उलटले आहेत. या काळात होर्मूज सामुद्रधुनीमधून कच्च्या तेलाची आणि गॅसची वाहतूक करणारी केवळ ९ जहाजेच जाऊ शकली आहेत. यामुळे जगभरात इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, हिंदुस्तानमध्येही एलपीजीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. सरकार पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तरीही नागरिकांनी पर्यायी पर्यायांचा विचार करावा.”
सरकारने म्हटले आहे की, घरगुती ग्राहकांपर्यंत १०० टक्के एलपीजी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पँनिक बुकिंगमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी परिस्थिती अजूनही काळजी करण्यासारखीच आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ गरजेपुरतीच गॅसची नोंदणी करावी, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. तसेच भविष्यातील अनिश्चितता पाहता जनतेने स्वतःच्या स्तरावर इतर इंधन पर्यायांची तयारी ठेवावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

























































