US-Israel-Iran War – ११ देशांच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणं टाळा, DGCA ची मोठी ॲडव्हायझरी जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्व आशियामध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्तानच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एक महत्त्वाची ॲडव्हायझरी जारी केली असून, विमान कंपन्यांना ११ देशांच्या हवाई क्षेत्राचा (Airspace) वापर टाळण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

युद्धामुळे हवाई क्षेत्र असुरक्षित

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत स्फोटक झाली आहे. इराणवर झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यांमुळे नागरी विमानांसाठी या भागातील आकाशात मोठा धोका निर्माण झाला आहे. इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याच्या शक्यतेमुळे हवाई वाहतुकीला लक्ष्य केले जाऊ शकते किंवा तांत्रिक चुकांमुळे अपघात घडू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

DGCA ने ज्या ११ देशांच्या हवाई क्षेत्राला हाय रिस्क म्हणून घोषित केले आहे, त्यामध्ये इराण, इस्रायल, लेबनॉन, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, इराक, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार आणि कुवेत या देशांचा समावेश आहे. ही ॲडव्हायझरी २८ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार असून, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.