
मध्य पूर्व आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता ब्रिटनला उघड इशारा दिला आहे. “जर ब्रिटनने अमेरिकेला कोणत्याही प्रकारची लष्करी किंवा राजनैतिक मदत केली, तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल,” अशी थेट धमकी इराणने दिली आहे. या विधानामुळे पाश्चात्य देश आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिका उघडपणे इस्रायलच्या बाजूने उभी राहिली आहे. अशा परिस्थितीत ब्रिटननेही अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवत इराणविरोधी मोहिमेत सहभाग घेतल्यास त्याचे परिणाम गंभीर होतील, असे इराणच्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले आहेत. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या सार्वभौमत्वावर घाला घालणाऱ्या कोणत्याही देशाला सोडले जाणार नाही, मग तो अमेरिका असो किंवा त्यांचा मित्रदेश ब्रिटन.
दरम्यान, ब्रिटनने अलीकडेच खाडी क्षेत्रात आपली लष्करी उपस्थिती वाढवण्याचे संकेत दिले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना इराणने म्हटले आहे की, ब्रिटनने दुसऱ्यांच्या युद्धात उडी घेऊन स्वतःच्या नागरिकांना आणि आर्थिक हितसंबंधांना धोक्यात आणू नये. इराणच्या या धमकीनंतर ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या नौदलाला आणि हवाई दलाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

























































