बंगाल निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून रणकंदन, TMC ची निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने (ECI) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केलेल्या घाऊक बदल्यांमुळे मोठे राजकीय युद्ध पेटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली असून, हे प्रकरण आता कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई करत राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक (DG) आणि कोलकाता पोलीस आयुक्तांसह ५० हून अधिक वरिष्ठ IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यातील अनेक अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी परराज्यात पाठवण्यात आले आहे. तसेच, ज्या अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे, त्यांना सध्या तरी निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात नियुक्त करता येणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

ममता बॅनर्जींचा इशारा

निवडणूक आयोगाच्या या पावलामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “जर राज्यात कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याला पूर्णपणे निवडणूक आयोगच जबाबदार असेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासकीय कामात अडथळा आणण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने (TMC) केला आहे.

टीएमसीचे नेते आणि ज्येष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी या बदल्यांविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांना परराज्यात निवडणूक निरीक्षक (Observer) म्हणून पाठवण्याचा अधिकार आयोगाला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्ती सुजॉय पाल आणि न्यायमूर्ती पार्थसारथी सेन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.