
अर्नाळा समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्लोक चिंदरकर आणि मंथन धोत्रे अशी मृत मुलांची नावे असून ते दोघे विरारमध्येच राहणारे होते. पाण्यात गेलेला फुटबॉल आणण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नववर्षानिमित्त शाळांना सुट्टी असल्याने जीवदानी रोड येथील आनंद दीप सोसायटीत राहणारे श्लोक आणि मंथन अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल खेळत असताना फुटबॉल पाण्यात गेला. तो आणण्यासाठी दोघेही समुद्रात गेले. मात्र याचदरम्यान समुद्राला भरती आली. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघेही बुडाले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
स्थानिक मदतीला धावले
घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीस पथकाने त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या दिवशी ही घटना घडल्याने विरार परिसरात शोककळा पसरली आहे.



























































