
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊरमध्ये आता माकडेदेखील सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका माकडाची चक्क बाणाने शिकार करण्यात आली आहे. व्यावसायिक तिरंदाजाने हा उद्योग केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून तो नराधम कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्राणिमित्रांनी केली आहे.
निसर्गरम्य येऊर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बंगले आणि हॉटेल आहेत. त्यामुळे संरक्षित जंगलांतील बन्यजीवांबर आता थेट हल्ले होऊ लागले असल्याची भीती प्राणिमित्रांनी केली आहे. बंगले तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या माकडांना हुसकावून लावले जाते. मात्र आता माकडांना बाण मारून त्यांना मारून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. वन्यजीव प्राणी कल्याण संस्थेने गंभीर जखमी अवस्थेतील माकडावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे हिरव्यागार परिसरात पशु क्रूरतेच्या चिंताजनक प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
“हे एक अमानुष कृत्य आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी. या प्रकरणात वनविभाग, ठाणे पालिका, तसेच पोलिसांनी या परिसरातील बेकायदेशीर हॉटेल, बंगलेधारकांची चौकशी करावी.”
– रोहित जोशी (पर्यावरण अभ्यासक)



























































