
वसई-विरार महानगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्याच महासभेत भाजप व बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. घोषणाबाजी, हमरीतुमरी आणि धक्काबुक्की यामुळे सभागृहात जणू आखाडाच निर्माण झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की सुरक्षारक्षकांना महासभेत यावे लागले. भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केल्याने संतप्त झालेल्या बविआच्या नगरसेवकांनीही प्रत्युत्तर दिले आणि वादाची ठिणगी पडली.
वसई-विरार महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. महापौरपदी आजीव पाटील हे विराजमान झाले. सत्ता स्थापनेनंतर आज पहिलीच महासभा असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पटलावर ३९ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापन व प्रभाग समितीची पुनर्रचना हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवक चर्चा करीत असतानाच अचानक बुलेट ट्रेनच्या संदर्भात सादरीकरण करण्यात आले.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रस्ते, आरोग्य, घनकचरा, पाणी असे अनेक विषय महत्त्वाचे असतानाही सभागृहात बुलेट ट्रेनबाबत सादरीकरण सुरू झाले आणि भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांचाही पारा वाढला. त्यांनी घोषणा सुरू केल्या. एवढेच नव्हे तर अनेक नगरसेवक हमरीतुमरीवर आले. अगदी धक्काबुक्कीदेखील एकमेकांना करण्यात आली. हे महापालिकेचे सभागृह आहे की कुस्तीचा आखाडा, असा प्रश्न अनेकांना पडला.
अखेर कामकाज तहकूब केले
सभागृहात घमासान सुरू असतानाच भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी ‘जनतेने घरी बसवले’ असे विधान केल्याने बविआचे नगरसेवक निशाद चोरघे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही क्षणातच त्याचे पर्यवसान हाणामारी व धक्काबुक्कीत झाले. पहिल्याच महासभेत जोरदार गोंधळ उडाल्याचे दिसून आले. परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच महापौर आजीव पाटील यांनी सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब केले.



























































