
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ (Dhurandhar 2: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाचे दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर आणि महेश बाबू यांनी भरभरून कौतुक केले. मात्र, धुरंदरचे कौतुक करणाऱ्या या स्टार्सवर प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी निशाणा साधला आहे.
‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर अल्लू अर्जुनने या चित्रपटाला “देशभक्ती आणि स्वॅगचे मिश्रण” म्हटले होते. तर ज्युनिअर एनटीआरने रणवीर सिंहच्या अभिनयाचे ‘मास्टरक्लास’ असे वर्णन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश राज यांनी एका युजरच्या पोस्टला रिट्विट केले. त्या युजरने विचारले होते की, “अल्लू अर्जुन, महेश बाबू आणि ज्युनिअर एनटीआर यांसारख्या दाक्षिणात्य स्टार्सनी चित्रपटाचे कौतुक केले आहे, अशावेळी बॉलिवूडमधील स्टार्स गप्प का आहेत?”
यावर उत्तर देताना प्रकाश राज यांनी लिहिले, ‘लाचारीची लक्षणे आता दक्षिणेतही पसरू लागली आहेत…’. तसेच प्रकाश राज यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात ते आपल्या घरात जुनी गाणी ऐकताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी “मी धुरंधरपासून खूप दूर आहे. तुम्ही आहात का?” अशी कॅप्शन टाकली आहे.


























































