
>> विजय पांढरीपांडे
सध्या विवाह समारंभाचे स्वरूप बदलले आहे. विवाह हा ‘संस्कार’ समजून घेण्याऐवजी, या सोहळ्याचे पावित्र्य राखण्याऐवजी सध्या केवळ थाटमाट आणि ‘साजरे’ करण्याचा देखावाच जास्त दिसून येतो.
आजकाल गावात, शहरात कुठेही लग्नाला जा… तिथला थाटमाट, खर्चिक व नेत्रदीपक समारंभ, सोहळे बघून प्रश्न पडतो की मूळ विवाहाचे पावित्र्य हरवत चालले आहे की काय? हे सगळे पाहिल्यावर भारत हा गरीब देश आहे हे विधान चुकीचे वाटते. अगदी स्वतला मध्यमवर्गीय म्हणणारेदेखील लग्न म्हटले की, वारेमाप खर्च करताना, पैशांची उधळपट्टी करताना दिसतात. यामागे मुद्दा रेटण्यासाठी बोलले जाते की, लग्न आयुष्यात एकदाच होते. मुलांनी हौस, मज्जा या वेळेस करायचा नाही तर केव्हा? यात मूळ संस्कार, वैदिक विधी, परंपरागत चालीरीती याला काही प्रमाणात फाटा दिला जातो. पूर्वीही थाटामाटात लग्ने व्हायची, पण कशाला किती महत्त्व द्यायचे याचे भान राखून.
आता तर सुरुवातीचा साखरपुडा विधीदेखील थाटामाटात केला जातो. मग केळवणाच्या पंगती सुरू होतात. त्यानंतर आता प्री वेडिंग शूटचे नवे फॅड सुरू झाले आहे. प्रत्यक्ष लग्न हा डेस्टिनेशन वेडिंग, इव्हेंट मॅनेजमेंटच्या वर्तुळात फिरणारा प्रकार. इथे हळदी, मेहंदी, संगीत, मग लग्न, स्वागत समारंभ…अशी मोठी रांग असते. त्यांची ठिकाणे वेगवेगळी, त्यांचे नेपथ्य वेगळे, फुलांची सजावट वेगळी, पार्श्वसंगीत वेगळे. त्यातही इव्हेंट मॅनेजमेंटवाले वेगवेगळ्या शकली लढवून तुमच्याकडून पैसे लुटण्याचे काम करतात.
अशा प्रत्येक इव्हेंटचा खाण्यापिण्याचा मेन्यूदेखील शाही पद्धतीचा असतो. पदार्थाची इतकी रेलचेल असते आणि दरही तेवढाच महागडा. त्यामुळे प्रत्येक प्लेट मागे तीन-चार अंकी रक्कम कॅटरिंगच्या घशात जाते. अशा सोहळ्यात भरपूर अन्न वायादेखील जाते. ज्याची कुणालाच पर्वा नसते. ज्या देशात कित्येक जण उपाशी राहतात, शेतकरी आत्महत्या करतात तिथे ही अशी इतकी अन्नाची नासाडी चक्रावून टाकणारी असते, पण त्याची पर्वा कुणाला? आहे पैसा, करा उधळपट्टी हाच दुराग्रह दिसतो.
या सर्व गोंधळात मूळ वैदिक विधी, त्यांचे महत्त्व, अर्थ हे सगळे दुय्यम ठरतात. वरातीत नाचण्याचा धांगडधिंगा इतका वेळ चालतो की अनेकदा लग्नाचा मुहूर्त टळून जातो. मग पंचांग वगैरे बघून हा मुहूर्त बघतातच कशाला हा प्रश्न पडतो! त्यानंतरचे विधी अनेकदा कार्यालय विशिष्ट वेळात सोडायचे म्हणून घाईगर्दीत उरकले जातात कसेतरी. त्याचे महत्त्व ना वधू-वराला असते, ना त्यांच्या आई-वडिलांना. काही ब्राह्मण अर्थ वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण त्याकडे कुणाचेही लक्ष नसते ती वचने, ते शास्त्राsक्त विधी यांचे महत्त्व, पावित्र्य वधू-वरांनी नीट समजून घेतले असते तर आजकाल होताहेत तितके तडकाफडकी घटस्फोट झालेच नसते. एकीकडे लाखो, करोडो रुपयांची उधळपट्टी करून लग्न सोहळे करायचे अन् दुसरीकडे काही महिन्यांतच पटत नाही म्हणून घटस्फोटासाठी अर्ज करून वेगळे व्हायचे, या विरोधाभासाचा अर्थ कसा लावणार?
काही ठिकाणी तर पत्रिका पाहून, सगळ्या चौकशा करून ठरवलेले लग्न काही महिन्यांत, वर्षांत मोडते. स्वभाव जुळत नाहीत. अहंभाव डोके वर काढतो. तडजोड करायला दोघांपैकी कुणाचीच तयारी नसते. दोघांचे प्रश्न त्यांचे त्यांनी आपापसात चर्चा करून सोडवायचे…तर तेही नाही. हेच लग्न आपण जुळविले, त्यात लाखो रुपये खर्च केले, म्हणजे अक्षरश उधळले, हे विसरून जातात. जितक्या घाईने लग्न जमवले जाते, त्याच घाईने कोर्टकचेऱयाच्या फेऱया मारून तिथेही वकिलांना लाखो रुपये देऊन, तडजोडी पोटी लाखाची दक्षिणा देऊन शेवटी लग्नबंधनातून सुटका करून घेतली जाते.
आता तर काही तरुण जोडपी चक्क लिव्ह इनच्या नव्या फॅडच्या छत्राखाली एकत्र राहतात. त्यांचेही आपापसात काही करार असतात.पटेल तोपर्यंत एकत्र राहायचे, नाही पटले तर वेगळे व्हायचे. सगळे आपापल्या लहानशा वर्तुळात कटिबद्ध. या सर्व पार्श्वभूमीवर एक भयानक विचार मनात येतो. येत्या दोन-तीन दशकांत ही लग्न संस्था, ही विवाह व्यवस्था टिकेल तरी का? की सगळाच मुक्त कोरडा व्यवहार उरेल?



























































