
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
आयुर्वेदातील शरीरशास्त्राच्या संकल्पनांपैकी एक म्हणजे रस धातू. ज्या व्यक्तीमध्ये रस धातू उत्तम दर्जाचा असतो, त्याला ‘रस सार’ किंवा ‘त्वक सार’ व्यक्ती म्हणतात. याबाबत अधिक जाणून घेऊया.
मागील लेखात आपण पाहिले त्या सात धातूंमधील पहिला धातू आहे रस धातू. ज्या व्यक्तीमध्ये रस धातू उत्तम दर्जाचा असतो, त्याला ‘रस सार’ किंवा ‘त्वक सार’ व्यक्ती म्हणतात. त्याची त्वचा स्निग्ध, मऊ आणि चमकदार असते. त्वचेवरील लव (केस) कोमल आणि खोलवर रुजलेली असते. त्वचा दिसायला प्रसन्न आणि निर्दोष असते. या बाह्य लक्षणावरून रस धातू उत्तम असणाऱया व्यक्ती लगेच ओळखता येईल.
रस धातूचे स्थान
रस धातूचे मुख्य स्थान हृदय मानले जाते. अन्न आमाशय आणि पक्वाशयात पचले जाते, त्यानंतर तयार होणारा पोषक अंश (आहार रस) हृदयात जातो आणि तिथून संपूर्ण शरीरात पसरतो असे सुश्रुत संहितेत सांगितले आहे.
रस धातूची कार्ये
सर्व वयोगटातील लोकांचे (मुले, तरुण आणि वृद्ध) पोषण करणे. मुलांमध्ये शरीराची वाढ आणि विकास करणे, मध्यम वयात इतर धातूंना स्थिर आणि सुस्थितीत ठेवणे, वृद्धपकाळात शरीराची झीज रोखणे आणि धातूंना पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचवणे, शरीराचे अवयव आणि पेशी मऊ व स्निग्ध ठेवणे, शरीराला स्थिरता देणे. मानसिक समाधान आणि तृप्ती देणे.
रस क्षय लक्षणे
जेव्हा शरीरात रस धातूची कमतरता निर्माण होते, तेव्हा महत्त्वाचे लक्षण म्हणजे शब्दसहिष्णुता- कुठलाही आवाज सहन न होणे हे महत्त्वाचे लक्षण दिसते. रसाद्वारे होणारे पोषण थांबते, ज्यामुळे शरीराला अन्नाचा पुरेसा अंश मिळत नाही. इतर धातूंची झीज होणे, तोंड कोरडे पडणे, त्वचा आणि शरीराचे अवयव कोरडे पडणे, शरीर कृश किंवा बारीक होणे, अतिशय तहान लागणे, पोट, हृदय आणि मनात रिकामेपणा जाणवणे, लवकर थकवा येणे, हृदयात वेदना होणे किंवा कोणीतरी हृदय जोरात हलवत असल्यासारखे वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि धडधड होणे, हृदयात तीव्र वेदना होणे, थोडेसे काम केल्यावरही प्रचंड थकवा जाणवणे, अशी लक्षणे दिसतात. रस धातू क्षय झाला की शरीरात ‘वात’ दोष वाढतो. वरील सर्व लक्षणे वाढलेल्या वात दोषामुळे दिसतात.
रस दुष्टी लक्षणे
जेव्हा रस धातू दूषित होतो, तेव्हा महत्त्वाचा आजार म्हणजे अन्नाबद्दल अनास्था निर्माण होणे. अन्नाला चव न लागणे, तोंडात विचित्र चव जाणवणे, चव ओळखता न येणे, मळमळणे किंवा तोंडात पाणी सुटणे, शरीरात जडपणा जाणवणे, झापड किंवा गुंगी येणे, अंगदुखी, ताप येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अॅनिमिया (रक्तपांढरी), शरीरातील विविध मार्गांमध्ये अडथळा निर्माण होणे, नपुंसकत्व, उत्साह नसणे, अवयवांची कार्यक्षमता कमी होणे, वजन घटणे, पचनशक्ती (अग्नी) मंदावणे किंवा नष्ट होणे, अकाली सुरकुत्या पडणे आणि केस पांढरे होणे, असे आजार आणि लक्षणे दिसून येतात.
रस धातू कसा सुधारावा?
सहा रसांनी युक्त, संतुलित आणि ताजा गरम आहार घेतल्यास उत्तम रस धातू तयार होतो. तसेच आहार कितीही चांगला असला तरी तो पचण्यासाठी ‘अग्नी’ प्रबळ असणे गरजेचे आहे. वेळेवर झोप, भूक लागल्यावरच जेवणे, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा यामुळे रस धातू निरोगी राहतो. रस हा मुळात जलीय द्रव स्वरूपाचा असतो. त्यामुळे आहारात ताज्या फळांचा रस, ताक, सुंठ घातलेले पाणी किंवा नारळ पाण्याचा समावेश करावा. गाईचे दूध आणि शुद्ध साजूक तूप हे रस धातूसाठी ‘अमृत’ मानले जाते.
आहारात नैसर्गिक गोडवा असलेल्या पदार्थांचा समावेश करा (उदा. गहू, तांदूळ, मूग डाळ). जेवण कोरडे नसावे, त्यात थोडय़ा प्रमाणात तेलाचा किंवा तुपाचा अंश असावा. द्राक्षे, डाळिंब, आवळा आणि खजूर हे रस धातूची शुद्धी व वृद्धी करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. जर रस क्षयामुळे थकवा येत असेल, तर दुधासोबत ‘शतावरी कल्प’ घेतल्यास रस धातूचे उत्तम पोषण होते. चांगले जेवण पचणे आवश्यक असते. त्यासाठी जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा, थोडे सैंधव मीठ आणि लिंबू रस घेतल्यास अग्नी प्रदीप्त होतो, ज्यामुळे आहार रसाची निर्मिती चांगली होते.
दररोज शरीराला किंवा किमान तळपायांना तिळाच्या तेलाने मसाज केल्याने त्वचेवरील ‘भ्राजक पित्त’ सुधारते आणि रस धातूचे लक्षण असलेल्या त्वचेला चमक येते. रात्रीची शांत झोप रस धातूच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे. जागरणामुळे वात वाढतो आणि रस धातू सुकतो. रस धातूचा थेट संबंध मनाशी असतो. अतिचिंता केल्याने रस धातूचा क्षय होतो. त्यामुळे प्राणायाम आणि ध्यान फायदेशीर ठरते.
अतितिखट, खारट आणि आंबट पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा. कोरडे अन्न, जंक फूड आणि शिळे अन्न खाणे टाळा. रस धातू अशाप्रकारे योग्य प्रमाणात राहिला तर अशा व्यक्तींना सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, उपभोग, बुद्धी, विद्या, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते.



























































