वेधक – सार्वजनिक गुढीची 38 वर्षांची  परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

महाराष्ट्रात लातूरची स्वतंत्र ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ओळख असलेल्या लातुरात मागील 38 वर्षांपासून सार्वजनिक गुढीच्या स्थापनेची परंपरा सुरू आहे. ज्या वेळी याची सुरुवात झाली तेव्हा कोणालाही वाटले नसेल की, ही एक लातूरची परंपरा ठरेल.

सार्वजनिक गुढीचे संस्थापक पंकज जैस्वाल यांनी सांगितले की, त्यांच्या घरी गुढी बसवण्याची परंपरा नव्हती. शहरातील भोई गल्ली भागातील दत्त मंदिर येथे गुरुवार संगीत क्लब होता. तिथे सर्व जण जमत होते. 1988 मध्ये सार्वजनिक गुढी बसवण्याचे ठरवले व त्यांच्याच हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर जवळपास चार वर्षे त्या ठिकाणी दरवर्षी गुढीपूजनाचा कार्यक्रम करण्यात येऊ लागला. नंतरच्या वर्षी हनुमान चौकात गुढी उभारली गेली. तिथून पुढे खर्डेकर स्टॉप येथे गुढी उभारली जाऊ लागली.

त्यानंतर गुढीचा प्रवास गांधी चौक, सुभाष चौक, शहरातील प्रसिद्ध असणारी गंजगोलाई असा झाला. सूर्योदयाच्या किरणांसोबत गुढीची उभारणी केली जाते. सायंकाळी सूर्य अस्ताच्या वेळी सन्मानपूर्वक गुढी विसर्जन केले जाते.

मागील काही वर्षांपासून गंजगोलाई येथे गुढी उभारली जाते व सोबतच सामाजिक प्रबोधन करण्याचे कामही केले जाते. ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पाणी वाचवा’, ‘प्लॅस्टिकचा वापर टाळा’, ‘निसर्ग पूजन’ हा एक प्रमुख उद्देश ठेवला जातो. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या प्रतिनिधींचा छोटेखानी सत्कार पण करण्यात येत असतो. विशेष म्हणजे सर्व जातीधर्मातील लोकांचा यात सहभाग असतो. त्यामुळे गुढीची परंपरा फक्त धार्मिक महत्त्वाची नसून सामाजिक एकतेचे, सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रतीक बनली आहे.

यासाठी संस्थापक अध्यक्ष  पंकज जैस्वाल, रामभाऊ जवळगे, संजय सोनकांबळे यांच्यासह अनेक मंडळी झटत असतात, परिश्रम घेत असतात. केवळ गुढी उभारणे व सोहळा साजरा करणे हेच या निमित्ताचे स्वरूप नसून या माध्यमातून लातूरमधील एकता, एक विचार कायम राहील यासाठीही प्रयत्न घेतले जातात. आपल्या प्रथा, परंपरा टिकण्यासाठी त्याच निगुतीने आणि चिकाटीने प्रयत्न केले गेले पाहिजेत. हेच संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांनी व्यक्त केले. या सोहळ्यात तरुणांचाही तितकाच सहभाग असतो, हे देखील एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरत आहे. असे उपक्रम साजरे व्हायला हवेत.

लातूरची ही सार्वजनिक गुढी आता पारंपरिक महोत्सवात रूपांतरित झाली आहे.