
उत्तर प्रदेशातील एका महाविद्यालयात दिवसाढवळ्या एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जोपर्यंत आपल्या मुलाला मारणाऱ्याचा पोलीस एन्काऊंटर करत नाही तोपर्यंत आपण मुलाचे अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा वडिलांनी घेतला आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील उदय प्रताप कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. सूर्य प्रताप सिंग हा BA च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो कॉलेजमधला एक हुशार विद्यार्थी होता. सूर्य प्रतापच्याच वर्गातील एका मुलाने कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी त्याच्या डोक्यात चार गोळ्या घालून त्याची हत्या केली. मनजीत चढ्ढा असे त्या आरोपीचे नाव असून तो सध्या फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
वडिलांचा आक्रमक पवित्रा
सूर्यप्रताप यांच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास वडिलांनी नकार दिला आहे. ”आरोपीचा एन्काउंटर: जोपर्यंत पोलीस आरोपीला पकडून त्याचा ‘एन्काउंटर’ करत नाहीत, तोपर्यंत मुलाचे अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका वडिलांनी घेतली आहे.


























































