
IPL 2026 चा रणसंग्राम 28 मार्चपासून सुरू होत असून क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर असला, तरी त्याने सलामीवीर, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत हे यश मिळवले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मादेखील या लीगमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, जेव्हा या दोन दिग्गज खेळाडूंची सलामीवीर म्हणून तुलना केली जाते, तेव्हा आकडेवारीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कणा असलेल्या विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 128 डावांत सलामीवीर म्हणून मैदानात पाऊल ठेवले आहे. यात त्याने 46.81 च्या सरासरीने आणि 139.17 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 5009 धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे, सलामीवीर म्हणून खेळताना विराटने 8 शतके आणि 39 अर्धशतके झळकावली असून, 177 षटकार आणि 467 चौकारांचा पाऊस पाडला आहे. त्याची सलामीवीर म्हणून सर्वोत्तम धावसंख्या 113 धावांची आहे.
दुसरीकडे, रोहित शर्माने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 117 डावांत फलंदाजी केली आहे. यात त्याने 28.78 च्या सरासरीने आणि 133.75 च्या स्ट्राईक रेटने 3166 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर सलामीवीर म्हणून 19 अर्धशतके आणि 1 शतक असून, त्याने 324 चौकार आणि 140 षटकार ठोकले आहेत. या भूमिकेत त्याची सर्वोच्च धावसंख्या 105 धावांची राहिली आहे. थोडक्यात सांगायचे तर, सलामीवीर म्हणून धावांच्या शर्यतीत विराटने रोहितपेक्षा 1843 धावांनी आघाडी घेतली आहे. आता आगामी 2026 च्या हंगामात हे दोन ‘बडे मिया’ काय चमत्कार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































