घसरणारा रुपया आणि इंधनाचे वाढते दर हे आगामी महागाईचे स्पष्ट संकेत; राहुल गांधी यांचा केंद्रावर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हिंदुस्थानवरही त्याचा परिणाम झाला आहे. या सर्व जागतिक घडामोडींमुळे घसरणारा रुपया आणि वाढत्या इंधन किमतींवरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकरावर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधींनी घसरणारा रुपया आणि महागडे औद्योगिक इंधन हे सर्वसामान्य लोकांसाठी आगामी मोठ्या संकटाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी सरकारकडे ठोस धोरणाचा अभाव आहे. निवडणुका संपताच तेल आणि गॅसच्या किमती वाढवून जनतेला लुटले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी यांनी देशातील वाढती महागाई आणि घसरणाऱ्या रुपयावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी इशारा दिला की रुपयाची कमजोरी आणि औद्योगिक इंधनाच्या दरातील वाढ ही केवळ आकडेवारी नसून, येऊ घातलेल्या आर्थिक त्सुनामीचे संकेत आहेत. सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधींनी विचारले, आता या परिस्थितीनंतर सामान्य माणसासाठी काय उरले आहे?

एक्सवर एक पोस्ट शेअर करत राहुल गांधींनी लिहिले की, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे १०० च्या दिशेने होणारे अवमूल्यन आणि इंधनाच्या दरातील वाढ थेट महागाईला कारणीभूत ठरत आहे. सरकार याला सामान्य म्हणू शकते, पण वस्तुस्थिती अशी आहे की यामुळे उत्पादन आणि वाहतूक या दोन्हींचा खर्च वाढेल. याचा थेट परिणाम दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होईल आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होईल.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) आणि शेअर बाजाराला असलेला धोका अधोरिखीत करत त्यांनी इतर आर्थिक आघाड्यांवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, रुपयाच्या घसरणीचा सर्वाधिक फटका लघु उद्योगांना (MSMEs) बसेल. शिवाय, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FIIs) बहिर्वाह वाढेल, ज्यामुळे शेअर बाजारावर मोठा दबाव येईल.

सरकारच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी यांनी दावा केला की, हा केवळ वेळेचा प्रश्न आहे. निवडणुका संपताच सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरातही लक्षणीय वाढ करेल. त्यांनी आरोप केला की, मोदी सरकारकडे अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी कोणतीही दिशा किंवा ठोस रणनीती नाही; ते केवळ पोकळ आश्वासने देत आहे. वाढत्या इंधानाच्या किमती हे आगामी महागाईचे संकेत आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारला धारेवर धरले.