
‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रपर पुस्तकावरून झालेल्या वादानंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आता कथालेखनाकडे मोर्चा वळवला आहे. ‘यापुढे फक्त काल्पनिक लिखाण करणार,’ असे त्यांनी म्हटले आहे.
‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’मध्ये नरवणे यांनी चिनी सैनिकांच्या घुसखोरीच्या प्रसंगाचे थरारक वर्णन केले आहे. त्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संरक्षण मंत्रालयाने हे पुस्तक प्रकाशित करण्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही. लोकसभेत राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा दाखला देत सरकारवर हल्ला चढवला होता. त्यामुळे पुस्तक देशभर चर्चेत होते.
त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एक्सप्रेस बुक सर्व्हिसमध्ये नरवणे यांनी आगामी लिखाणाबद्दल माहिती दिली. ‘द पँटोनमेंट कॉन्सिपरेन्सी’ या त्यांच्या कादंबरीचीही त्यांनी माहिती दिली. ‘हे पुस्तक मागच्या वर्षी प्रकाशित झालंय. पुस्तक लेखनाबद्दल फारशी माहिती नसतानाही मी ते लिहिलं. ते वाचलं जात आहे याचा आनंद आहे. सैनिक ते लेखक हा प्रवास खूपच मजेशीर होता. लिहिताना मला मजा आली. तोच अनुभव वाचकांनाही येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कादंबरीचा पुढचा भागही लवकरच येईल,’ असे ते म्हणाले.

























































