
नांदेडमधील वाजेगाव बंधारा परिसरात एका धावत्या दुचाकीचा अचानक भीषण स्पह्ट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत दुचाकीस्वार तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्राथमिक पाहणीत दुचाकीजवळ काही संशयास्पद वस्तू सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने ‘दहशतवादविरोधी पथक’ आणि फॉरेन्सिक तज्ञांना बोलावण्यात आले आहे. पोलीस सध्या तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्वच बाजूंनी तपास करत आहेत. ईदनिमित्त शनिवारी सकाळी शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर अनेक मुस्लिम बांधव नमाजासाठी जमले होते. या ठिकाणापासून काही अंतरावरच असलेल्या वाजेगाव बंधारा परिसरात सकाळी 9.30 च्या सुमारास एक तरुण दुचाकीवरून जात होता. यावेळी अचानक दुचाकीचा मोठा स्पह्ट झाला आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले.


























































