दिलेला शब्द पाळला! चिमुकल्या फॅनची इच्छा रश्मिका-विजयने केली पूर्ण; हृदयस्पर्शी भेटीचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा महिन्याभरापूर्वीच लग्नबंधनात अडकले. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या लग्नाला आपल्याला बोलावले नाही म्हणून विजय-रश्मिकाची एक चिमुकली चाहती नाराज झाली होती. हा व्हिडीओ पाहून विजयने मी तुला जेवायला घरी बोलावणार असल्याचे कमेंटमध्ये स्पष्ट केले होते. विजयने त्या लहान फॅनला दिलेलं वचन आता पूर्ण केले आहे. या चिमुकल्या फॅनला विजय आणि रश्मिकाने थेट आपल्या घरी जेवायला बोलावून एक अविस्मरणीय भेट दिली आहे.

दिलेला शब्द पाळत विजय आणि रश्मिकाने या चिमुरडीला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला हैदराबादमधील आपल्या घरी आमंत्रित केले. यावेळी विजयची आई माधवी देवरकोंडा देखील उपस्थित होत्या. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विजय त्या चिमुकलीला मांडीवर घेऊन खेळवताना दिसत आहे, तर रश्मिका तिला प्रेमाने लाडू भरवून तिचे लाड करताना दिसत आहे. या दोघांनीही तिला स्वतःच्या हाताने जेवण दिले आणि तिच्यासोबत गप्पा मारल्या. या साधेपणामुळे चाहत्यांनी या जोडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या भेटीनंतर त्या चिमुकल्या चाहतीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कधीही न विसरता येणारा क्षण आहे. विजय अण्णा आणि रश्मिका अक्काने आम्हाला आमच्या हक्काच्या माणसांसारखी वागणूक दिली., असे तिने म्हटले आहे. केवळ चित्रपटातच नाही, तर खऱ्या आयुष्यातही या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली  आहेत. ‘वीरोश’ (ViRosh) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीचा हा ‘रिअल लाइफ’ व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे.

मी तुझी फॅन नाही का? लग्नाला न बोलावल्याने चिमुकली झाली नाराज; व्हिडीओ व्हायरल होताच विजय देवरकोंडानं केली मोठी कमिटमेंट!