
इतर वेगवेगळ्या क्षेत्रांसाोबत आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) मोठी क्रांती घडवून आणली आहे. कोड लिहिण्यापासून ते त्याच्या टेस्टिंगपर्यंत सर्वच गोष्टींसाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, एनव्हिडियाचे (Nvidia) सीईओ जेन्सन हुआंग यांनी इंजिनिअरींगबाबत काही नवीन संकेत दिले आहेत. त्यांच्या मते, भविष्यात इंजिनिअर्सचे मूल्यमापन त्यांनी किती ओळींचा कोड लिहिला यावरून नाही, तर त्यांनी कामासाठी किती ‘AI टोकन्स’ वापरले, यावरून केले जाईल.
‘AI टोकन्स’ म्हणजे एआय सिस्टिमद्वारे प्रक्रिया केल्या जाणाऱ्या मजकुराचे किंवा माहितीचे छोटे घटक. जेव्हा एखादा इंजिनिअर एआयला प्रॉम्प्ट देतो, तेव्हा प्रत्येक शब्द किंवा डेटा प्रक्रियेसाठी ठराविक टोकन्स खर्च होतात. ज्याप्रमाणे वीज वापरण्यासाठी युनिट्स मोजले जातात, तसेच एआयच्या वापरासाठी टोकन्स हे मोजमाप आहे. अँथ्रॉपिक किंवा गुगल सारख्या कंपन्या या टोकन्सच्या वापरासाठी शुल्क आकारतात. त्यामुळे टोकनचा वापर म्हणजेच पर्यायाने त्या कंपनीचा ‘कॉम्प्युट’ (कॉम्प्युटिंग पॉवर) वापरणे होय.
जेन्सन हुआंग यांच्या मते, भविष्यातील कंपन्या इंजिनिअर्सना केवळ पगारच देणार नाहीत, तर त्यांना एक मोठे ‘टोकन बजेट’ही उपलब्ध करून देतील. जर एखाद्या इंजिनिअरचा पगार 5 लाख डॉलर्स असेल आणि त्याने वर्षाअखेरीस 2.5 लाख डॉलर्सचे टोकन्स वापरले नाहीत, तर ती चिंतेची बाब ठरेल. त्यामुळे एआय टूल्सचा जास्तीत जास्त वापर करून आपली कार्यक्षमता कित्येक पटीने वाढवणे आवश्यक आहे. जो इंजिनिअर एआयचा प्रभावी वापर करेल, तोच कामावर जास्त काळ टिकेल, असे मत हुआंग यांनी व्यक्त केले.
या नवीन बदलामुळे येणाऱ्या काळात नोकरी मिळवण्यासाठी किंवा चांगल्या पॅकेजसाठी ‘कॉम्प्युट ॲक्सेस’ हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. ज्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त एआय सोर्स उपलब्ध करून देतील, तिथेच टॅलेंटला वाव मिळेल. त्यामुळे आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये ‘जास्त कष्ट’ करण्यापेक्षा एआयचा वापर करून ‘जास्त उत्पादन’ (Output) घेणाऱ्यांना अधिक मागणी असेल.
























































