
जागतिक बाजारातील घडामोडी आणि आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा हिंदुस्थानी चलनाला मोठा फटका बसला असून रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 94 इतक्या सर्वात निचांकी पातळीवर पोहोचला आहे. तेलाचे वाढते आयात बिल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून हिंदुस्थानी बाजारातून सतत पैसे काढल्यामुळे रुपयात ही घसरण झाली. रुपयाची वाटचाल शंभरीकडून सुरू असून या घसरणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
रविवारी सकाळी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अबकी बार, रुपया 100 के पार! रुपयाची शतकाकडे वाटचाल सुरू असताना मोदी कुठे आहेत, तर ते पश्चिम बंगालमध्ये आहेत. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी करत आहेत. मोदी आणि शहा पश्चिम बंगालमध्ये खेला करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इकडे रुपयाचे मूल्य घसरत चालले आहे.
#WATCH | Delhi: On decline in Indian Rupee value, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, “There will be a century…Abki baar, 100 ke paar. Where is Modi ji? He is in West Bengal, preparing for President’s Rule to defeat Mamata Banerjee. Modi ji and Shah ji are attempting to do… pic.twitter.com/B4RZnwKpwi
— ANI (@ANI) March 22, 2026
डॉलरच्या तुलनेत रुपया शंभरी गाठत असून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे सूत्रधार याबाबत बोलायला तयार नाहीत. मोदीजी म्हणायचे की जेव्हा रुपयाचे मूल्य घसरते, तेव्हा देशाची प्रतिष्ठाही घसरते. मग आता नक्की काय घसरत आहे? सरकारची चड्डी घसरत आहे का? असा बोचरा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पश्चिम बंगालमध्ये सत्ता, पैसा आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने खेला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. माझे त्यांना एवढेच म्हणणे आहे की, तुम्ही लढत राहा. पश्चिम बंगालमध्ये भाजप पराभूत होताना दिसत आहे, त्यामुळे तिथे अघोषित आणीबाणी लावत आहेत. हे योग्य नाही, असेही राऊत यांनी फटकारले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या तुरुंगातील अनुभवावरील ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘Unlikely Paradise’ उद्या 23 मार्च रोजी प्रकाशित होत आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हे राजकीय कैद्याचे आत्मवृत्त आहे. सरकारने मला तुरुंगात टाकले आणि तुरुंगातील अनुभवांवर मी ते पुस्तक लिहिले. संजय सिंह, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, साकेत गोखले या सर्वांना माझे सांगणे आहे की, तुम्हीही तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवा. सरकारने विरोधकांचा कशा प्रकारे छळ केला, खोटे गुन्हे दाखल करत तुरुंगात टाकले या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला हव्या. इंग्रजी आवृत्तीमध्ये काही नवीन प्रकरणं जोडली गेली आहेत. मराठी आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर काही नवीन घडामोडी समोर आल्या आणि ते नवीन प्रकरणं त्यात जोडली आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.























































